भूमिका अभिनयात पुरोगामी विद्यालय आसरा अव्वल;लोकनृत्यात श्रीराम हायस्कूल टाकरखेड्याची बाजी
भातकुली:- केंद्र सरकार व NCERT यांच्या दिशानिर्देशानुसार लोकसंख्या शिक्षण विभागाच्या वतीने तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट),अमरावती यांच्या अंतर्गत तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन शिक्षण विभाग,पंचायत समिती भातकुली यांच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धांचे उत्साहात आयोजन पुरोगामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,आसरा येथे करण्यात आले. या स्पर्धेत भूमिका अभिनय आणि समूह लोकनृत्य अशा दोन गटांचा समावेश होता. भूमिका अभिनय स्पर्धेत पुरोगामी विद्यालय,आसरा यांनी प्रथम क्रमांक पटकावला,तर समूह लोकनृत्य स्पर्धेत श्रीराम हायस्कूल,टाकरखेडा यांनी प्रथम क्रमांक मिळवित बाजी मारली. दोन्ही गटांतील प्रथम क्रमांकाच्या शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,आसरा येथील प्राचार्य गोपाल वडतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख प्रशांत शेंदूरकर,पंचायत समिती भातकुलीचे विषय समन्वयक सतीश वानखडे,जिल्हा गणित मंडळाचे सचिव संजय गेडाम तसेच श्रीराम हायस्कूल,टाकरखेडा येथील मुख्याध्यापक सोलव सर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून बोबडे सर,सुनील ढोणे आणि उमाकांत उके यांनी जबाबदारी पार पाडली. तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध शाळांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भूमिका अभिनयाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांचे प्रभावी सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी समूह लोकनृत्याच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे आणि सांघिक कौशल्याचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. लोकसंख्या शिक्षण विभागाच्या या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव,सर्जनशीलता,कलागुण आणि आत्मविश्वास विकसित करण्याची संधी मिळाली. प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दोन्ही शाळांना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात आले. स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विभाग,पंचायत समिती भातकुली तसेच पुरोगामी विद्यालय,आसरा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.