टिटवाळ्यात आम आदमी पक्षाकडून "झाडू" घेऊन "नाईक बाबा" निवडणुकीच्या मैदानात
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मांडा टिटवाळा येथील प्रसिद्ध समाज सेवक संदीप नाईक उर्फ नाईक बाबा आम आदमी पक्षाकडून "झाडू" घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. संदीप नाईक यांनी मांडा टिटवाळा परिसरातील अनेक सामाजिक समस्यांना लाईव्ह दाखवून सदरील कामे करून घेण्यात यश मिळवले आहे. यात प्रामुख्याने मांडा पश्चिमेतील एमएमआरडीए कडून मांडा पश्चिम ते वासुंद्री रोड था रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागले. सदरवेळी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यांनी 90 फीट रिंग रोड मध्ये कटिंग साठी जाण्याऱ्या 170 घरांचे पुनर्वसन व्हावे यासाठी आवाज उठवला होता. त्यांनी मांडा टिटवाळा परिसरातील रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले,रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करून अनेक कामे मार्गस्थ लावलेले आहेत. त्यांनी अर्धवट राहिलेले गटारे, पिण्याचे पाण्याचे समस्या, गटारांवरील तुटलेली झाकणे, हॉस्पिटल मधील रुग्णांची होत असलेली हेळसांड इत्यादी,अनेक समस्यांचा आपल्या फेसबुक लाईव्ह द्वारे भांडाफोड करून या समस्या मार्गी लावण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत 384 मते मिळवली होती. मांडा टिटवाळा परिसरातील अनेक नागरिकांच्या विविध समस्या फेसबुक लाईव्ह दाखवून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये रस्त्यांवर उतरून आपल्या संपूर्ण टीम सह पथ नाट्य सादर करून पांचसो मे बिक जाओगे तो ऐसाही रोड पाओगे या दिलेल्या घोषणा खूपच गाजल्या होत्या. त्याची दखल हि अनेक प्रसार माध्यमांनी घेतली होती. नाईक बाबाच्या डोक्यावरील टोपी व गळ्यातील मफलर हा त्यांचा विशेष पेहराव येथील नागरिकांना विशेष आठवणीत राहण्या सारखा आहे. त्यांनी आजवर केलेल्या जनसामान्यांच्या कामावर आता थांबायचं नाही. असा पण उराशी घेऊन आम आदमी पक्षाचा झाडू हातात घेऊन निवडणुकीच्या माध्यमातुन साफसफाई करण्यासाठी आपले बाहू सरसावलेले आहेत. त्यांना आपल्या पॅनल क्रमांक 3 मधील नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा वाटते.