"मराठमोळ्या पेहरावाची खिल्ली उडवली...जिद्दीने घडवला स्वतःच्या कपड्यांचा ब्रँड"
छावा चित्रपटात विकी कौशलने परिधान केलेले कपडे हे मराठमोळ्या ब्रॅंडचे आहेत. खरं तर आपला मराठमोळा पेहराव कुठेच मिळत नसल्याचे पाहून एका ध्येय्यवेड्या तरुणाने स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचे ठरवले. त्याने बनवलेला ड्रेस पाहून एका फॅशन डिझायनरला हसू आलं. 'हे काय मुलींसारखा ड्रेस बनवलाय' म्हणत पेहरावाची खिल्ली उडवली. त्याचं हे बोलणं पुण्याचा दीपक मानेला खटकलं आणि स्वतःचा 'रॉयल तष्ट' नावाने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड सुरू केला. आज देशविदेशात दीपक माने यांनी त्यांच्या या कपड्यांच्या ब्रँडचं नाव पोहोचवलं आहे. पुण्याच्या दीपक माने या तरुणाने मोठ्या कष्टाने हे ध्येय गाठलं आहे. "Royal Tasta" या नावाने दीपक माने यांनी अगोदर घरातूनच कपड्यांचा ब्रँड सुरू केला. महाराष्ट्रीयन कपडे लग्नात घालायला मिळत नाहीत या विचाराने ते झपाटून पेटले आणि तसे कपडे बनवण्यास त्यांनी सुरुवात केली. गेल्या १० वर्षात अथक परिश्रम घेऊन पुण्यातील पिंपरीचिंचवड येथील काळभोरनगर येथे या ब्रँडचं मोठं शो रूम त्यांनी सुरू केलं. पॅरिस, लंडनमध्ये त्यांनी अनेक फॅशन शो केले. या ब्रँडच्या एका फॅशन शोमध्ये दीपक माने यांनी गरीब, अपंग, वृद्धांना मॉडेल म्हणून समोर आणलं होतं. तेव्हा लोकांनी त्यांना खूप ट्रोल केलं. पण आईचा पाठिंबा आणि मेहनत, आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय संस्कृतीचा पेहराव देशविदेशात पोहोचावा या हेतूने त्यांनी हे कपडे बनवण्यास सुरुवात केली. आज अनेक मोठमोठ्या लग्नसोहळ्यात रॉयल तष्ट या ब्रँडची क्रेझ पाहायला मिळते. मराठी सेलिब्रिटी विश्वातही या ब्रँडची क्रेझ आहे एवढंच नाही तर राजकिय नेत्यांनाही या ब्रँडची भुरळ पडली आहे. छावा चित्रपटातील विकी कौशलचे कपडे असो किंवा नुकत्याच पार पडलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या साखरपुड्यात तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेही (शंभूराज) याच ब्रॅंडचे कपडे परिधान केले होते. तर अभिजित खांडकेकर, सुव्रत जोशी, सोनाली कुलकर्णी, अंकित मोहन, रुपाली भोसले, सिद्धार्थ खिरीड यांनीही या ब्रॅंडचे मॉडेल म्हणून काम केले आहे. दीपक माने यांचं निगडी, प्राधिकरण येथे मोठं घर आहे, ब्रँडेड गाड्या, बाईक्सचे मोठे कलेक्शन त्यांच्याकडे आहे ते धार्मिक देखील आहेत. वारीमध्येही ते सहभागी होताना दिसतात हे विशेष. आज दीपक माने यांनी मराठी नाव फॅशन जगतात मोठं केलं आहे याचं कौतुक तर नक्कीच व्हायला हवं!!.