मुंबईत आरोग्य सेवेचा भव्य सोहळा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ यशवंतराव चव्हाण केंद्रात रविवारी
ठाणे : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ हा भव्य राज्यस्तरीय सोहळा रविवारी २२ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संपन्न होणार आहे. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था,डॉक्टर,पत्रकार, आरोग्य अधिकारी व तळागाळातील कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार असून, विविध लोकोपयोगी आरोग्य उपक्रमांचा शुभारंभही या कार्यक्रमात केला जाणार आहे. राज्याच्या आरोग्य धोरणांना अधिक बळ देत लोकसहभागातून आरोग्य सेवा प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असून,केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२३ ते २०२५ या कालावधीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २३ मान्यवरांना ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येक पुरस्कारार्थ्यास रोख रुपये १ लाख,प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे. आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देणे,उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून आरोग्य अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी,आशा स्वयंसेविका आणि विविध विशेष मोहिमांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली जाणार आहे. दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे,तर मानसिक-सामाजिक आधार व घरपोच सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. कर्करोग,हृदयरोग, मधुमेह,श्वसन विकार तसेच वृद्धापकाळातील गंभीर आजारांवरील रुग्णांना या माध्यमातून वेदनानियंत्रण व समुपदेशन सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिलांच्या रजोनिवृत्ती काळातील आरोग्य गरजा लक्षात घेऊन राज्यातील ५८० ठिकाणी ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले असून,दर बुधवारी विशेष ओपीडी सेवा उपलब्ध असेल. महिलांच्या आरोग्यविषयक गरजांना स्वतंत्र ओळख देत महाराष्ट्राने देशात नवा आदर्श निर्माण केल्याचे मानले जात आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार व शस्त्रक्रिया सेवा सुरू करण्यात येत असून,ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार मिळणार आहेत. त्यामुळे शहरांकडे होणारी रुग्णांची धावपळ कमी होऊन आरोग्य सेवा अधिक सर्वसमावेशक होणार आहे. या कार्यक्रमात आरोग्य दिनदर्शिका,हॉस्पिटल व पीएचसी मॅन्युअल,जन्म-मृत्यू साहित्य,माहितीपट तसेच ‘मात्र’ (MAATR) अंतर्गत आशांसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या आरोग्यविषयक व्हिडिओचे प्रकाशन करण्यात येणार आहे. आरोग्य सेवेतील उत्कृष्टतेचा गौरव,तळागाळातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान,महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल आणि मानवकेंद्री आरोग्य सेवा उपक्रमांचा प्रारंभ अशा बहुआयामी कार्यक्रमांनी सजलेला हा सोहळा महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी नवी दिशा देणारा आणि प्रेरणादायी ठरणार आहे.