‘नन्हे सितारे’ मधून जिल्हा परिषद शाळांच्या प्रतिमेला नवी दिशा
अमरावती :- ‘नन्हे सितारे’ हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नसून, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भविष्यातील मोठ्या उडीची पहिली पायरी आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी केले. ‘नन्हे सितारे’ या जीवनकौशल्यांवर आधारित उपक्रमाच्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. शनिवार,१० जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद वर्धा,जे. सी. फ्लावर्स आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (OLF) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतीश मुगल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना संजिता मोहपात्रा यांनी शिक्षक आणि अधिकाऱ्यांना आवाहन केले की, “जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी आपल्यालाच बदलायची आहे. अनेक शिक्षक आजही उत्तम काम करत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले,त्यांना प्रशिक्षित केले आणि ‘नन्हे सितारे’च्या मंचावर आणले. आपण पहिलं पाऊल टाकलं आहे;आता जिल्हा परिषद शाळांची प्रतिमा बदलणं अटळ आहे.” ‘नन्हे सितारे’ या उपक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा आयोजित करणे इतकाच मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास,आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. डिसेंबर महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमाला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा आणि तालुका स्तरावरील प्राथमिक फेऱ्यांमधून १२० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, त्यापैकी ११० विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ग्रँड फिनालेमध्ये आपली प्रतिभा सादर केली.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे योग्य, पारदर्शक आणि न्याय्य मूल्यमापन व्हावे यासाठी शिक्षण, साहित्य आणि कायदा क्षेत्रातील अनुभवी व प्रतिष्ठित व्यक्तींनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. या परीक्षकांमध्ये नीता काचवे,प्रतिभा टेटू,वैशाली गारकल,अतुल पडोळे,ज्ञानदा पाटील,निकिता घाटे,लोचना हरणे आणि योगिता वनारे यांचा समावेश होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेतील सादरीकरणांचे मूल्यमापन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता १ ते ३,४ ते ५,६ ते ८ आणि ९ ते १२ अशा चार गटांमध्ये स्पोकन इंग्लिश,कथा सादरीकरण आणि कविता वाचन या तीन प्रमुख प्रकारांत विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी OLFच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख चित्रा खन्ना यांनी सांगितले की, जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या भक्कम पाठबळाशिवाय हा उपक्रम यशस्वी होणे शक्य नव्हते. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे आभार मानत संपूर्ण ‘विनोबा’ टीमच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन OLFचे कम्युनिटी डेव्हलपमेंट मॅनेजर विजय वावगे यांनी आपल्या टीमसह केले. प्रोग्राम मॅनेजर रघुनाथ वानखडे, प्रोजेक्ट ऑफिसर्स सागर गजभिये व उत्कर्ष मेश्राम यांच्यासह संपूर्ण OLF टीमने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ‘नन्हे सितारे’ ही स्पर्धा अमरावती जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या “आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रम” अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षकांचे सक्षमीकरण करणे आणि नवोपक्रमशील अध्यापनाला चालना देणे हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. ‘विनोबा ॲप’मुळे शिक्षक आणि प्रशासन यांच्यात सुलभ संवाद शक्य झाला असून,यामुळे प्रक्रियाही अधिक सोप्या झाल्या आहेत. ‘नन्हे सितारे’सारखे उपक्रम ही याच सामूहिक प्रेरणा आणि शिक्षणप्रक्रियेची फलश्रुती आहे.या मध्ये शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक यांचे मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे. नन्हे सितारे मध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची भरारी जिल्हा परिषद अमरावती व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची भरारी घेतली.यात स्पोकन इंग्लिश स्पर्धा वर्ग ६ते ८ मध्ये प्रथम क्रमांक आयुष वाहने,द्वितीय स्वराज जामोदकर,तृतीय मिताली गावंडे हे जिल्हा स्तरावर यशवंत झाले.स्पोकन इंग्लिश स्पर्धा वर्ग ४ते ५ मध्ये प्रथम क्रमांक अनुष्का सवाई,द्वितीय करिष्मा गायगोले,तृतीय क्रमांक हरीश तर्व्हेकर यांनी प्राप्त केला.तसेच झाले.स्पोकन इंग्लिश स्पर्धा वर्ग १ ते ३ मध्ये प्रथम क्रमांक अस्मिता भस्मे,द्वितीय जुनेरा इन्तेसम,तृतीय क्रमांक नेहा वाघ यांनी पटकाविला.त्याचप्रमाणे कविता सादरीकरण वर्ग ६ ते ८ मध्ये प्रथम क्रमांक नव्या वाघ,द्वितीय दर्शन लोंढे,तृतीय गौरी बोबडे यांनी प्राप्त केला.कविता सादरीकरण वर्ग ४ ते ५ मध्ये प्रथम क्रमांक काव्या सोलव,द्वितीय आरुषी देवघरे,तृतीय क्रमांक आर्यन भोवते यांनी प्राप्त केला.कविता सादरीकरण वर्ग १ ते ३ मध्ये प्रथम क्रमांक अद्विका ढोरे,द्वितीय अक्षरा चौके,तृतीय क्रमांक आदर्श मुंढे यांनी प्राप्त केला.कथाकथन वर्ग ६ ते ८ मध्ये प्रथम क्रमांक सय्यद तहेमिल,द्वितीय अंकिता नेवारे,तृतीय क्रमांक शिवानी जगताप यांनी प्राप्त केला.कथाकथन वर्ग ४ ते ५ मध्ये प्रथम क्रमांक सिद्धी माथने,द्वितीय रिद्धी पाटणकर,तृतीय क्रमांक अमृता बाबडे यांनी प्राप्त केला.कथाकथन वर्ग १ ते ३ मध्ये प्रथम क्रमांक अनन्या खंडारे,द्वितीय अद्वैत भडके,तृतीय क्रमांक आरुषी जांभूळकर यांनी पटकाविला.