महाराष्ट्राच्या तिरंदाजांना ऑलिंपियन आणि वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदके
महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ऑलिंपियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या झारखंडला नमवित ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात गुरुवारी दोन सुवर्णपदके जिंकून धमाका केला. गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने शूट ऑफपर्यंत ताणलेल्या रिकर्व्ह मिश्र दुहेरीच्या लढतीत बाजी मारत सुवर्णभेद साधला. याचबरोबर गाथा खडके, वैष्णवी पवार व शर्वरी शेंडे या त्रिकुटाने रिकर्व्ह महिलांच्या सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने हरयाणाच्या पारस हुडा व भजन कौर या जोडीला तोडीस तोड लढत दिली. उभय जोड्यांमध्ये एक एक गुणासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला होता. शेवटी ही लढत ४-४ अशी बरोबरीत सुटल्याने शूट ऑफमध्ये गेली. शूट ऑफमध्ये वन ॲरो शुटमध्ये विजय प्रस्थापित करत सुवर्ण पदक पटकाविले. हरयाणाच्या जोडीने ९,९ असा वेध घेतला. मग गाथानेही ९ गुणांचाच वेध घेतल्याने महाराष्ट्राची धाकधूक वाढली होती. मात्र, बाबरेकरने मोक्याच्या वेळी १० गुणांचा वेध घेत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले.
गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे व मुक्ता मोडगी यांनी सांघिक महिला गटातून झारखंडच्या दीपिका कुमारी, अंकिता भगत व कोमालिका बारी या स्टार खेळाडूंनी सजलेल्या संघाचा ६-१ फरकाने पराभव करून महाराष्ट्राच्या झोळीत सुवर्णपदक टाकले. या संघास समीर म्हस्के यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. महाराष्ट्राने ही दोन सुवर्णपदके जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे खेळाडू व चाहत्यांनी “जय शिवाजी, जय भवानी’, ‘जय महाराष्ट्र टीम महाराष्ट्र’ अशा घोषणा देत मैदान दणाणून सोडले.
मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंशने केली कांस्य पदकाची कमाई
मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारीला 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या इतर खेळाडूंचा उपांत्य फेरीपूर्वीच पराभव झाल्याने मुष्टीयुद्धातील महाराष्ट्राचे हे एकमेव पदक ठरले आहे. 60 ते 63.5 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत ऑलिंपिकमध्ये तीन वेळा प्रतिनिधित्व करणार्या शिवा थापाला महाराष्ट्राच्या हरिवंश तिवारीने शेवटपर्यंत जिद्दीने लढत दिली.