केसनंदच्या अर्जुन संतोष हरगुडे'ची भारतीय हॉकी कनिष्ठ संघात निवड...
हवेली तालुकासह पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण;सर्व स्तरावर अर्जुनचे होतेय कौतुक
गौतम पाटोळे (प्रतिनिधी)
फुलगाव:- आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या २० वर्षांखालील (कनिष्ठ) पुरुष हॉकी संघात पुण्याच्या हवेली तालुक्यातील केसनंद(तळेराणवाडी) गावचा रहिवासी असलेला उदयोन्मुख हॉकीपटू अर्जुन संतोष हरगुडे याची निवड झाल्याने केसनंद गावासह हवेली तालुका व पुणे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. 'हॉकी इंडिया'ने ५ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या बेल्जियम दौऱ्यासाठी २२ सदस्यीय भारतीय कनिष्ठ संघाची घोषणा केली आहे.मुख्य प्रशिक्षक फ्रेडरिक सोयेझ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कनिष्ठ संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे.राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी,खेळाप्रती असलेली निष्ठा आणि कठोर परिश्रम व आपले पिता संतोष पोपट हरगुडे यांच्या कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांच्या जोरावर अर्जुनने भारतीय संघात मानाचे स्थान मिळवले आहे. प्रसिद्ध ऑलिम्पिकपटू धनराज पिल्ले व विक्रम पिल्ले यांच्यानंतर भारतीय संघात थेट प्रतिनिधित्व करणारा अर्जुन हा या राज्यातील तिसरा खेळाडू ठरला आहे.आजवर त्याला 'हॉकी महाराष्ट्र'चे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे तसेच ऑलिम्पिकपटू विक्रम पिल्ले यांच्यासह प्रशिक्षक अनिकेत मोरे,सागरसिंग ठाकूर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याचे अर्जुनचे वडील संतोष हरगुडे यांनी सांगितले. अर्जुन संतोष हरगुडे हा माजी आमदार दिपक पायगुडे यांच्या फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूलचा विद्यार्थी आहे. याच शाळेत त्याची खेळाची सुरुवात झाली असून आज तो राष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत आहे,याचा सार्थ अभिमान व आनंद असून एक दिवस तो भारताच्या संघाचे नेतृत्व करेल,असा विश्वास संस्थाप्रमुख दीपक पायगुडे यांनी व्यक्त केला.
केसनंद गावात आनंदाचे वातावरण - हवेली तालुक्यातील केसनंद गावच्या अर्जुन संतोष हरगुडेच्या निवडीमुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अर्जुनला लहानपणापासूनच त्याचे वडील तथा केसनंदचे माजी उपसरपंच संतोष हरगुडे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे पाठबळ लाभले.त्याच्या या यशामुळे हरगुडे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव जिल्हा परिषद सदस्य सुरेखा रमेश हरगुडे,माजी सरपंच मिलिंद हरगुडे यांच्यासह अनेकांकडून होत असून,संपूर्ण गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. अत्यंत परिश्रमाने व आपल्या क्रीडा कौशल्याने अर्जुनने हे यश मिळवल्याने केसनंद गावासह पुणे जिल्हा व राज्यसह देशाचाही अभिमान उंचावला आहे. त्याच्या या प्रेरणादायी यशाचा आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे.तो परत आल्यावर त्याचा गावच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
मिलिंद हरगुडे,माजी सरपंच,केसनंद. -भारतीय हॉकी कनिष्ठ संघात आमच्या अर्जुन संतोष हरगुडे यांची निवड झाल्याने आमची गावची व आमची मान ताठ मनाने उभी राहिली आहे.मी अर्जुंनचे केसनंद - कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटाच्या वतीने व जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करीत असून त्याला पुढील कार्यास खेळास शुभेच्छा देत आहे.
सुरेखा रमेश हरगुडे,सदस्या-जिल्हा परिषद,पुणे