• Total Visitor ( 670313 )
News photo

अपघातग्रस्त वारक-यांचे वारसांना १५ लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी

Raju Tapal publisher July 14, 2026 201

अपघातग्रस्त वारक-यांचे वारसांना १५ लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी

अखिल भारत हिंदू महासभेचे मुख्यमंत्र्यांना साकडे  

संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यातील घटना          



फुलगाव ( गौतम पाटोळे ) :- संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात नुकत्याच घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी अपघातात ३ वारकरी यांचा मृत्यू झाला तर ७ वारकरी जखमी झाले. पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या पायी वारीत वारकरी भाविकांच्या दिंडीतील वारकरी यांना ट्रकने धडक दिल्याने दुर्दैवी अपघात झाला. यात ३ निष्पाप वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच ७ जण जखमी झाले आहेत.  ही घटना संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी आणि समस्त हिंदू समाजासाठी अत्यंत वेदनादायी आहे. अपघातग्रस्त वारक-यांचे वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे वतीने वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज रौंधळ,पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यामंत्री एकनाथजी शिंदे,श्रीमती सुनेत्राताई पवार,श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमाईटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे,पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांचेसह पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांना निवेदन देऊन त्यांना वारकरी भाविकांना भरीव मदत देण्यासाठी साकडे अखिल भारत हिंदू सभेचे वतीने घालण्यात आले आहे. या दुर्दैवी अपघाताचे घटनेतील पायी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या अपघाती निधनाबद्दल मृतांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासह इतर ७ जखमींना भरीव मदत सहकार्य देण्यासाठी निवेदन देत विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यात मृत वारकरी हे सामान्य कुटुंबातील असून, ते अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने वारीत सहभागी झाले होते. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावला गेला असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण प्रसंगी या पीडित कुटुंबांना आधार देणे ही शासनाची तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहाळ्या अंतर्गत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी यांची हि नैतिक जबाबदारी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

विविध मागण्यांमध्ये सदर अपघातात मृत पावलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या वारसांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी 15 लाख रुपयांची भरीव आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच मृत वारकरी भाविक यांचे वारसांना प्रत्यके कुटुंबातून किमान एका व्यक्तीस राज्य शासनाने शासकीय सेवेत नोकरी देऊन दिलासा द्यावा. या अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने करावा. तसेच उपचारा नंतरचा पुढील सहा महिन्याचा खर्च श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी  यांनी करावा. या साठी आळंदी देवस्थानने भरीव आर्थिक मदत द्यावी. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वारी मार्गावर पोलीस बंदोबस्त अधिक कडक करावा आणि अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत,या साठी कडक उपाय योजना कराव्यात. सुरक्षित भक्तिमय वारी होण्यासाठी वाहतूक पोलीस,वारी बंदोस्त अधिक प्रभावी ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. अखिल भारत हिंदू महासभा राष्ट्रीय संरक्षक श्री श्री १००८ जगद्गुरु स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज,राष्ट्रीय धर्म प्रचारक श्रीमंत शिवनाथ जी महाराज, योगी आनंद दादा नाथजी गुरु सुखनाथ जी महाराज,  बालयोगी ऋषिकेश नाथ जी महाराज गुरु महंत शिवनाथ जी महाराज,राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मोहन सदचिदानंदजी सरस्वती जी महाराज,महंत योगानंद सरस्वती जी महाराज,महंत केशवानंद सरस्वती जी महाराज,राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेंद्र वर्मा,राष्ट्रीय महामंत्री डॉ. सिद्धार्थ भट्टाचार्य आदींनी मागणीसाठी प्रस्ताव दिला आहे. या प्रकरणी गांभीर्य ओळखून, पीडित कुटुंबांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास अखिल भारत हिंदू महासभेतर्फे वेळ प्रसंगी सनदशीर मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement