मांडा-टिटवाळा येथे हिंदू गोसावी समाजासाठी दफनभूमीची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
राजू टपाल.
टिटवाळा:- हिंदू गोसावी समाजासाठी मांडा-टिटवाळा परिसरात स्वतंत्र दफनभूमीसाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी,या मागणीसाठी दशनाम गोसावी समाज संस्था,ठाणे यांच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. गोसावी समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दफनभूमीची आवश्यकता असते. मात्र मांडा-टिटवाळा परिसरात समाजासाठी स्वतंत्र दफनभूमीची जागा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समाजाच्या धार्मिक परंपरा व भावनांचा विचार करून दफनभूमीसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनामध्ये हिंदू दफनभूमीसाठी आरक्षण क्रमांक ३१,मौजे मांडा येथील उपलब्ध जागा समाजासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे निवेदने व स्मरणपत्रे सादर करण्यात आली असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी दशोनाम गोसावी समाज संस्थेचे अध्यक्ष ॲड. श विलास भारती,कार्याध्यक्ष अरविंद गोसावी,सचिव राजेंद्र गोसावी,कोषाध्यक्ष सागर गोसावी,रविंद्र पिंपळे,पदमसिंग बाविस्कर,नरेंद वाणी यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष, सल्लागार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मनसेचे दिलीप राठोड आणि ॲड.अविनाश पांडुरंग शिळकंदे,रोहित जोशी,ॲड. महेश गायकवाड हे देखील उपस्थित होते. गोसावी समाजाच्या या मूलभूत व धार्मिक गरजेचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून मांडा-टिटवाळा परिसरात दफनभूमीसाठी शासकीय जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. “समाजाच्या धार्मिक परंपरा आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी,” अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.