प्रभाग क्रमांक ३ च्या प्रभारी नियुक्तीवरून भाजपात नाराजी;स्थानिक कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप
राजू टपाल.
टिटवाळा : भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा संघटनेने विविध प्रभागांसाठी प्रभारी नियुक्ती जाहीर केली असली,तरी प्रभाग क्रमांक ३ च्या प्रभारी नियुक्तीवरून पक्षातील एका गटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ही नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असल्याचे मत भाजपा मोहना टिटवाळा मंडळ सरचिटणीस अनंता बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले आहे. भाजपाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार प्रभाग क्रमांक ३ मध्ये आंबिवली गावठाण (पश्चिम), मांडा (पूर्व) आणि टिटवाळा गणेश मंदिर परिसर यांचा समावेश असून या प्रभागासाठी परेश गुजरे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र,या नियुक्तीपूर्वी स्थानिक पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि सक्रिय कार्यकर्त्यांशी कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचा दावा नाराज गटाने केला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांना डावलून घेतलेला हा निर्णय असल्याने पक्षात असंतोष वाढल्याचे बोलले जात आहे. काही कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींनी या निर्णयाचा फेरविचार करून स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा,अशी मागणी केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा नाराजीचा संघटनात्मक कामकाजावर परिणाम होऊ शकतो,अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान,या नियुक्तीबाबत भाजपाच्या जिल्हा नेतृत्वाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांची भूमिका आणि पक्षश्रेष्ठींचा पुढील निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.