मोफत प्रशिक्षण शिबिरातून १५० हून अधिक महिलांना स्वावलंबनाची दिशा;टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण
राजू टपाल.
टिटवाळा :- घनकचरा व्यवस्थापन NUML-KDMC योजनेअंतर्गत स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून वृषदीप वात्सल्य सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांसाठी आणि मुलींसाठी 'टाकाऊपासून टिकाऊ' वस्तू बनविण्याचे मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात १५० हून अधिक महिलांनी सहभाग घेत स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. या प्रशिक्षण शिबिरात महिलांना टाकाऊ वस्तूंपासून विविध उपयुक्त वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. तसेच परिसर,घर आणि अंगण स्वच्छ ठेवण्याबाबत घनकचरा व्यवस्थापनाची जनजागृती करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्वही सहभागी महिलांना समजावून सांगण्यात आले. शिबिरातील सहभागी महिलांना डायरी,स्वच्छता अभियान पुस्तिका,टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली बॅग तसेच घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत स्वच्छ भारत अभियान आणि वृषदीप वात्सल्य सामाजिक संस्थेच्या वतीने सरकारमान्य प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सर्व सहभागींसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यासोबतच महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचाही आनंददायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमासाठी संस्थापिका तथा अध्यक्षा तृप्ती गायकवाड,महिला व बालविकास समुपदेशन केंद्राचे स्वप्निल वाहने आणि घनकचरा व्यवस्थापन प्रशिक्षक जितेंद्र साळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की,टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक व उपयुक्त वस्तू तयार करून महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. अशा प्रशिक्षणातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळणार असून महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल.
वृषदीप वात्सल्य सामाजिक संस्था महिला सक्षमीकरण,स्वच्छता जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असून भविष्यातही अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.