स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत इयत्ता दहावीच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात
शिरूर:- स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत इयत्ता दहावी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक २ जून २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रशालेतील दहावीचे सर्व विद्यार्थी,सर्व विषय शिक्षक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे मानद सचिव श्री अरविंददादा ढमढेरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम पाच क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्र, श्रीफळ व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये प्रशालेतील प्रथम क्रमांक चौधरी तृप्ती गणेश व निर्मयी संदीप गोसावी यांनी पटकावला,द्वितीय क्रमांक पुंडे उत्कर्ष बाबासाहेब, तृतीय क्रमांक ढमढेरे अनुष्का सचिन, चौथा क्रमांक ढमढेरे भक्ती सुनील व पाचवा क्रमांक कुंभार यश अमोल या विद्यार्थ्यांनी मिळवला. शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे मानद सचिव श्री अरविंददादा ढमढेरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना त्यांनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व उच्च शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, शिस्त व मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील अनुभव सांगितले. शिक्षकांनी घेतलेल्या अथक परिश्रमांबद्दल, दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल व वेळोवेळी केलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रशालेतील शिक्षकांचे योगदान आपल्या यशामागील महत्त्वाचा घटक असल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून नमूद केले. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत भावनिक स्वरूपाचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अशोकराव दहिफळे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जालिंदर आखाडे यांनी केले. प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, ज्येष्ठ शिक्षिका,अलका सातपुते,रूपाली ढमढेरे,नंदा सातपुते रवींद्र सातपुते,अरुण भगत,हर्षाली भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी,शिक्षक व पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा गुणपत्रिका व प्रमाणपत्र वाटप समारंभ संस्मरणीय ठरला. आनंद,उत्साह आणि भावनिक वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,संस्थेचे संचालक व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे,ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे यांनी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.