रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य नागरी सत्कार
राजू टपाल.
मुंबई:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त शुक्रवारी,१४ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईत भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मंत्रालयासमोर,मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता हा विशेष सोहळा होणार आहे. केंद्रीय मंत्रिपदाची दहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल रामदास आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असून,त्यांच्या सार्वजनिक व राजकीय कारकिर्दीतील या महत्त्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार,सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ कांबळे, सूत्रसंचालक म्हणून विवेक पवार,तर स्वागताध्यक्ष म्हणून संजय पवार यांची भूमिका आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे. ‘सेवा,समर्पण,संघर्ष’ या भावनेतून सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त होणाऱ्या या सत्कार सोहळ्याकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.