• Total Visitor ( 487747 )
News photo

घरभाडे, मुलांचे शुल्क भरायचे कसे? पगार थकल्याने नवले रुग्‍णालयाच्‍या कर्मचाऱ्यांनी मांडला ठिय्या! 

Raju tapal August 07, 2025 193

घरभाडे, मुलांचे शुल्क भरायचे कसे? पगार थकल्याने नवले रुग्‍णालयाच्‍या कर्मचाऱ्यांनी मांडला ठिय्या! 



पुणे :- गेल्‍या आठ महिन्‍यांपासून पगार झालेला नाही. परिणामी घरभाडे थकल्‍याने घरमालक सामान बाहेर फेकून देत आहे. मुलांच्या शाळेचे शुल्क भरायचे आहे. नातेवाइकांकडून उसने आणि खासगी सावकारांकडून व्‍याजाने पैसे घेऊन कर्जबाजारी झालो आहोत. पगार मागितल्यास प्रशासन म्‍हणते, 'काम सोडून जा,' त्यामुळे धड काम करू शकत नाही अन् थकलेला तीन ते पाच लाखांचा पगारही सोडून जाऊ शकत नाही,'' अशी व्‍यथा नऱ्हेतील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालयात काम करणाऱ्या कर्मचारी, परिचारिका व इतर अशैक्षणिक कामे करणाऱ्यांनी व्‍यक्‍त केली.



येथील परिचारिका, औषध निर्माण अधिकारी (फार्मासिस्‍ट), वैद्यकीय समाजसेवक, समुपदेशक, तंत्रज्ञ, बाह्यरुग्ण विभागातील कर्मचारी, बहुउद्देशीय कर्मचारी, ब्रदर, मावशी, वॉर्ड बॉय व सुरक्षारक्षक अशा सर्वच प्रकारच्‍या दीड हजार कर्मचाऱ्यांचा पगार गेल्‍या आठ महिन्‍यांपासून थकला आहे. त्‍यापैकी ५० ते ६० टक्‍के कर्मचाऱ्यांनी रुग्‍णालयाच्‍या नवीन इमारतीसमोरील दरवाजावरच मंगळवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. जवळपास ४० टक्‍के कर्मचारी कामावर आहेत. त्‍याने रुग्‍णालयातील रुग्‍णसेवा विस्‍कळित झाल्‍याचे पाहायला मिळाले.



डॉक्‍टरांचा झाला, आमचा का नाही?



प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्‍यापक, सहयोगी प्राध्‍यापक, सहाय्यक प्राध्‍यापक या अडीचशे जणांचा पाच महिन्‍यांचा थकीत असलेला १६ ते १७ कोटींचा पगार केल्याचे कळाल्‍यानंतर व यांना डावलल्‍यानंतर येथील कर्मचाऱ्यांमध्‍ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे त्‍यांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. डॉक्‍टरांचा पगार केला, मग आमचा का नाही, असाही प्रश्‍न कर्मचारी विचारत होते.



मी गेल्‍या दहा वर्षांपासून रुग्‍णसेवा देते. महिन्‍याचा ६० हजार पगार आहे. घरभाडे, मुलांच्‍या शाळेचा खर्च यासाठी नातेवाईक व व्‍याजाने पैसे घेतले आहेत. हे काम सोडून दुसऱ्या रुग्‍णालयात जायचे, तर आठ महिन्‍यांपासून चार लाख ८० हजार थकलेल्‍या पगारावर पाणी सोडावे लागेल.- एक परिचारिका



प्रशासनाकडे पगार मागायला गेल्यास 'होईल' असे सांगतात किंवा कामावरून काढून टाकेल, असे सांगितले जाते. संस्‍थेचे नाव पाहून आम्‍हाला बँकही लोन देत नाही. घर कसे चालवायचे, हा प्रश्‍न पडला आहे. येथे ड्यूटी केल्‍याने दुसरीकडेही करता येत नाही.-एक कर्मचारी



रुग्‍णालय ६५० खाटांचे असून, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय मिळून जवळपास दीड हजार कर्मचारी आहेत. प्राप्तिकर विभागाने अचानक नोटीस पाठवून ४७ कोटी रुपये जप्‍त केले. त्‍यामुळे पगार थकला आहे. विद्यार्थ्यां‍चे नवीन प्रवेश होणार असून, त्‍यांच्‍या शुल्‍कातून हे पगार करण्‍यात येतील. -डॉ. कृष्णकांत पाटील, अधिष्‍ठाता, काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय.



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement