• Total Visitor ( 571543 )

अजित पवार आले नसते तर आमचे १०० आमदार जिंकून आले असते; गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य 

Raju tapal February 08, 2025 88

अजित पवार आले नसते तर आमचे १०० आमदार जिंकून आले असते; गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य 



नांदेड :- राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज नांदेड येथील कार्यक्रमात महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आले नसते तर आमचेही 100 आमदार निवडून आले असते", असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवारांची एन्ट्री मागून झाली. कारण वरची अँडजस्टमेंट होती, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांची सध्या आभार यात्रा सुरु आहे. ही आभार यात्रा आज नांदेडला पोहोचली. आभार यात्रेच्या आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधी गुलाबराव पाटील यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी संबंधित वक्तव्य केलं.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड येथील आभार यात्रेत गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुंवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या आधी झालेल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी आपल्या स्टाईलमध्ये विरोधकांचा समाचार घेतला. एकनाथ शिंदे यांच्यामुळे नांदेडचा इतिहास बदलला आहे. या जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे काम हेमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना, भगवा आणि शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्याचे काम केले. त्यासाठीच आम्ही सुरत मार्गे गुवहाटीला गेलो. पण आमच्या या निर्णयावर गद्दार म्हणून टीका केली जाते. पण विधानसभा निवडणुकीत आमच्या लाडक्या बहि‍णींनी रेकाॅर्डब्रेक यश दिले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा 237 आमदार महायुतीचे निवडून आले. असे गुलाबराव पाटील म्हणाले. 



राज्यातील गोरगरीबांसाठी योजना राबवत एकनाथ शिंदे यांचा हात कोणीही धरू शकत नाही. ते खऱ्या अर्थाने जादूगर आहेत, त्यांच्या जादूमुळेच लोकसभेला सात खासदार आणि विधानसभेत 80 जागा लढवून आमचे 60 आमदार निवडून आले. अजितदादा नसते तर आमचेही शंभर आमदार निवडून आले असते, पण त्यांची मागून एन्ट्री झाली. दिल्लीहून काही निर्णय झाले, ते स्वीकारावे लागतात, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. अजित पवार नसते तर आमचेही 100 आमदार झाले असते. त्यांची मागून एन्ट्री झाली म्हणून प्रोब्लेम झाला. शेवटी वरची अँडजस्टमेंट आहे. आमच्या साहेबांनी दाडीवर हात फिरवला तर काम होऊन जाईल. आम्ही  80 जागा लढवल्या, आमचे 60 आमदार निवडून आले, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement