कलियुगामध्ये शिक्षक म्हणजे ज्ञानमंदिरातील दैवत आहे ; ह.भ.प.माऊली महाराज पिंगळे
शिक्रापूर:- कलियुगामध्ये शिक्षक म्हणजे ज्ञानमंदिरातील दैवत आहे असे प्रतिपादन ह.भ.प. माऊली महाराज पिंगळे यांनी शिक्रापूर येथे केले. निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदीर विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे यांचे बंधू राजीवदादा जयवंतराव मांढरे पाटील गुरूजी यांचे सोमवार दि.५ जानेवारीला निधन झाले. कै.राजीवदादा जयवंतराव मांढरे पाटील गुरूजी यांच्या दशक्रिया विधीचे आज रविवार दि.११ जानेवारीला शिक्रापूर येथील वेळनदीतिरी आयोजन केले होते. मांढरे परिवाराने आयोजित केलेल्या दशक्रिया विधी प्रवचनात ह.भ.प.माऊली महाराज पिंगळे बोलत होते. मुलं घडवायचं मी आजही काम करतो असे सांगून ह.भ.प.पिंगळे महाराज प्रवचनात पुढे बोलताना म्हणाले, तुम्ही शिक्षक लोक मुलांना पोट भरण्याची विद्या देता.त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करता.योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करता.आई वडिलांची जोपासना कशी करावी,नात्यागोत्यांशी संबंध कसे असावेत,मित्रपरिवार कसा जोडावा याचे धडे मुलांना देता. कलियुगात मुलांना बाह्य अंग जास्त लागले आहे.बाह्य मैत्री जास्त लागली आहे.या मैत्रीमध्ये मुलांचे जीवन अत्यंत दूरगामी,वाईट अवस्थेत चालले आहे.आता शिक्षकांना बाह्य मुले एकेरी हाक मारतात.अन्नामध्ये सगळी भेसळ झाली आहे.अन्नापासून संपत्ती पर्यंत,मैत्रीपर्यंत भेसळ झाली आहे.वातावरण दुषित झाले आहे.विसंगत जीवन जगायला सुरुवात झाली म्हणून आपल्या मुलांना संस्कार, संस्कृती,आचार विचार याची बैठक राहिली नाही. शिक्षक रक्ताचं पाणी करतात असे सांगताना ह.भ.प. माऊली महाराज पिंगळे म्हणाले, माझ्या वर्गातले विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजेत कोणीतरी एखादा वकील,डाॅक्टर,इंजिनिअर,सुसंस्कृत नागरिक,कलेक्टर झाला पाहिजे ही भूमिका शिक्षकाची आहे.ती मुलं त्या गोष्टी किती यशस्वीपणे पार पाडतात हे त्यांच्या अभ्यासावरती,शिक्षकांशी एकनिष्ठ राहाण्यावरती अवलंबून आहे. पशुपक्षी देवाशी कनेक्ट राहिले,एकनिष्ठ राहिले देवाने त्यांचा उद्धार केला.विद्यार्थी जर आपल्या मंदीरातील गुरूशी,शिक्षकाशी एकनिष्ठ राहिला तर त्याचासुद्धा उद्धार होतो.आपणच इतिहास लोका़ंपुढे मांडला पाहिजे.आपणच संतांचे ग्रंथ भगवंताची भक्ती,देवाचा साक्षात्कार लोकांपुढे ठेवावेत. तुमची मुलं योग्य दिशेने वाटचाल करतात,गुरूजनांचा आदर करतात,माता पित्याचा आदर करतात हीच त्या घरातील आई बापाची श्रीमंती. देव मान्य करायला शिका हे सांगताना ह.भ.प.माऊली महाराज पिंगळे म्हणाले,पंढरपूरची वारी व्यवस्थेसाठी नसते,अवस्थेसाठी असते.पशुपक्ष्यांना सुद्धा देवाने मुक्ती दिली मोक्ष दिला,सुख दिलं,आनंद दिला. देवाच्या आस्तित्वाशिवाय आपण काहीच करू शकत नाही.नासलेले कांदे आपण भरत नाही.चांगल्या कांद्याच्या नांदी लागतो.तसा देव चांगल्या कांद्याच्या नादी लागतो.नासलेल्या कांद्याच्या नादी लागत नाही.आपला कांदा सडू देवू नका. आपला देह नासका होवू देवू नका,या देहाला सुसंस्कृत ठेवा. निरोगी,निर्व्यसनी ठेवण्याचा प्रयत्न करा असे आवाहन ह.भ.प. माऊली महाराज पिंगळे यांनी प्रवचनात केले. एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचायं,घेत राहा.पण अनुभव चा़ंगला सिद्ध होत नसेल तर तो मार्ग लगेच बदलला पाहिजे.योग्य मार्गाने पुढे गेलं पाहिजे. सगळ्यात योग्य मार्ग संतांचा मार्ग आहे. आयुष्यात कधीही अडचण येणार नाही ज्ञानोबारायांनी तुमचा - आमचा उद्धार करण्याकरिता ज्ञानेश्वरी निर्माण केली असेही ह.भ.प.माऊली महाराज पिंगळे यांनी प्रवचनात सांगितले. कै.राजीव जयवंतराव मांढरे पाटील गुरूजी यांच्या प्रतिमेचे त्यांचे जावई स्वप्निल प्रकाश देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कै.राजीव मांढरे पाटील गुरूजी यांना श्रध्दांजली अर्पण करताना ह.भ.प. माऊली महाराज पिंगळे म्हणाले,राम मंदीर उभारणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान रामभक्त म्हणून होते.आपल्या कुटूंबाचं पालन पोषण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.मित्रपरिवारामध्ये प्रतिष्ठा मिळविली,मान मिळविला.चांगल्या पद्धतीचे काम केले.आपल्या गावाशी, आपल्या सगळ्या परिवाराशी चांगल्या पद्धतीने नाळ जोडली पण ६१ व्या वर्षी काळाने घाला घातला. माजी सरपंच आबासाहेब करंजे यांच्या हस्ते ह.भ.प.माऊली महाराज पिंगळे यांचा सन्मान करण्यात आला. मंगलदास बा़ंदल,त्रिनयन कळमकर,राजाभाऊ मांढरे,रमेश भुजबळ,सुरेश थोरात,रमेश जगदाळे,सोपानराव धुमाळ गुरूजी,संपतराव शिंदे,कृष्णा वाडेकर,मोनिका हरगुडे,रामभाऊ सासवडे,मोहनशेठ विरोळे पाटील,सोमनाथ भुजबळ,पंढाभाऊ गायकवाड,सेवानिवृत्त शिक्षक प्रा.बाबुराव साकोरे सर या उपस्थितांनी कै.राजीव जयवंतराव मांढरे पाटील गुरूजी यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,व्यापार,उद्योग,धार्मिक,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था,संघटनांचे पदाधिकारी दशक्रिया विधीस उपस्थित होते.