कोरेगाव मूळ ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला देण्यात याव्यात
खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांचे महाराष्ट्र वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र
शिरूर:- शिरूर लोकसभा मतदारसंघातील मौजे कोरेगाव मूळ परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पिंजरे लावून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणेला तातडीने सुचना देण्यात याव्यात असे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना कळविले आहे. खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना कळविलेल्या पत्रात असे म्हटले आहे, प्रयागधाम व कोरेगाव मूळ शिवारातील नदीकाठच्या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याने तीन वाहनांवर हल्ला करून त्यांना ठार करण्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिक,शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.याबाबत स्थानिक वन अधिका-यांना वेळोवेळी माहिती देण्यात आलेली असूनही अद्याप पर्यंत ठोस कार्यवाही झालेली नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. तरी सदर बाबीची गांभीर्याने दखल घेवून परिसरात तातडीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात . तसेच वन विभागामार्फत आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करण्याबाबत तसेच परिसरात गस्त वाढवून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला तातडीने देण्यात याव्यात असे पत्रात म्हटले आहे.