स्पा सेंटर चालकाकडून ५० हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप; पत्रकाराला शिताफीने पकडले! १० हजारांची खंडणी स्वीकारताना सापळा; २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त...
पिंपरी-चिंचवड :- प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. स्पा सेंटर चालकाकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागून त्यापैकी १० हजार रुपये स्वीकारताना सापळा रचून एका साप्ताहिकाच्या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,साजिद मन्सूर पेंढारी (वय २७, व्यवसाय खासगी नोकरी,रा.साखरेवस्ती,पांडुरंग बिल्डिंग,हिंजवडी,पुणे) याने स्पा सेंटर चालकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास स्पा सेंटरबाबत वर्तमानपत्रात बातम्या छापून व्यवसाय बंद पाडण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी स्पा सेंटर चालकाने पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने सापळा रचला. त्यानुसार ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील रहाटणी परिसरातील साई कॉर्नर, जगताप डेअरी चौक येथे १० हजार रुपये स्वीकारताना संबंधित आरोपीला पकडण्यात आल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
२ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त या कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम,एक मोबाइल फोन,एका साप्ताहिकाचे ओळखपत्र आणि होंडा कंपनीची कार असा एकूण २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती दिली आहे.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२) व ३०८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल काळेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड तसेच पथकातील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.