किर्तन म्हणजे आत्मकल्याणाचे साधन;ह.भ.प.पवनमहाराज शास्त्री
विजय ढमढेरे
शिरूर:- किर्तन म्हणजे मनोरंजनाचे साधन नसून आत्मकल्याणाचे साधन आहे असे प्रतिपादन श्री क्षेत्र आळंदी येथील किर्तनकार ह.भ.प. पवन महाराज शास्त्री यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले. कोंढापुरी येथील ग्रामस्थ बाळकृष्ण धोंडीबा गायकवाड यांनी रविवार दि.३० आॅगस्ट ला रात्री ७ वाजता आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्यातील किर्तनात ह.भ.प.पवन महाराज शास्त्री किर्तन सांगताना बोलत होते. कोंढापुरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला किर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवाची प्राप्ती करून देवाचे दर्शन करून देणारे साधन म्हणजे किर्तन आहे असे सांगून किर्तनात पुढे बोलताना ह.भ.प.पवन महाराज शास्त्री म्हणाले,किर्तनात तुम्ही येवून नुसते बसले,भगवंताचे नामस्मरण तुमच्या कानावर पडले तरी तुमच्या जीवनाचे कल्याण,सार्थक झाल्याशिवाय राहाणार नाही. तुळशीला घातलेले पाणी कधीच वाया जात नाही.गो - मातेला चारलेला घास कधीच वाया जात नाही.पंढरपूरची केलेली वारी कधीच वाया जात नाही.आई- वडिलांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही.गोरगरिबांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही.अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तन- मन -धनाने केलेली सेवा कधीच वाया जात नाही असे ह.भ.प. पवन महाराज शास्त्री यांनी किर्तनात श्रोत्यांना सांगितले. तुकोबारायांनी स्वतःच्या गळ्यातला वीणा काढला . मनाच्या गळ्यामध्ये घातला म्हणून विण्याची सेवा केली जाते.मनाचा वीणा श्रेष्ठ आहे का ? असा सवाल किर्तनकार ह.भ.प.पवनमहाराज शास्त्री यांनी उपस्थित श्रोत्यांना केला. या पृथ्वीतलावावर तीन जगद्गुरु झाले.पहिले जगद्गुरु शंकराचार्य.दुसरे भगवान श्रीकृष्ण.तिसरे जगद्गुरु ज्यांनी तुमच्या आमच्या संसाराचा उद्धार व्हावा म्हणून स्वत:घ्या संसाराची राखरांगोळी करुन ग्रंथ दिला गाथा ते माझे श्रीमंत तुकोबाराया तिसरे आहेत.आता यापुढे होणे शक्य नाही.जीवन जगत असताना आपल्याला साधुसंतांची,गोरगरिबांची सेवा करायची.जीवन जगत असताना एकदा तरी पंढरपूरला जा असे किर्तनकार पवन महाराज शास्त्री यांनी उपस्थित श्रोत्यांना सांगितले. माणूस किती दिवस जगला हे महत्वाचे नाही.माणूस त्याचे जीवन कसा जगला हे महत्वाचे आहे.माणूस नकळत बोलता- बोलता पाप करतो.संसारात मनुष्याचे वय जसे वाढत जाते तशी -तशी त्याची किंमत आपोआप कमी होते.परमार्थामध्ये लहान असला तरी त्याची किंमत वाढत जाते.जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर प्रत्येकाशी प्रेमाने वागायचे, प्रत्येकाशी प्रेमाने राहायचे.जो वीणा तुम्हाला दिसतोय तो साधासुधा नाही.तो श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रसाद आहे असे किर्तनकार ह.भ.प.पवनमहाराज शास्त्री यांनी किर्तनात सांगितले. कोंढापुरी येथील ग्रामस्थ शामराव गेणूजी घाडगे,तान्हाजी किसनराव गायकवाड, अंबर राधूजी गायकवाड या अन्नदात्यांनी किर्तनास उपस्थित असलेल्या भाविकांची जेवणाची सोय केली. किर्तन संपल्यानंतर खंडाळे येथील श्री.हनुमान भजनी मंडळाचा हरिजागर,भजनाचा कार्यक्रम पार पडला.