प्रयागराजमध्ये एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त;मिरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रासह गुजरात,उत्तर प्रदेशातील २१ आरोपींना अटक; तब्बल ६४ किलो ७५९ ग्रॅम एमडी जप्त
मिरा-भाईंदर:- नालासोपारा पूर्व येथे दाखल झालेल्या अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याचा तपास करताना मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एमडी (मेफेड्रोन) तयार करणारा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त केला असून,या प्रकरणात महाराष्ट्र,गुजरात आणि उत्तर प्रदेशातील एकूण २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. २४ जून २०२६ रोजी रात्री नालासोपारा पूर्व येथील प्रगतीनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत अविनाश ऊर्फ सोनू लोकनाथ अय्यर (वय २२) आणि रविकांत ओमप्रकाश राम (वय २३) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ११९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. या प्रकरणी नालासोपारा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची व्याप्ती वाढली गुन्ह्याच्या तपासात आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमली पदार्थाच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान नालासोपारा,मुंबई,कल्याण,नेरळ,जळगाव,गुजरात आणि उत्तर प्रदेशपर्यंत पोलिसांनी कारवाई केली. तपासात प्रयागराज,उत्तर प्रदेश येथे एमडी तयार करण्यासाठी बेकायदेशीर कारखाना सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करत या कारखान्यावर छापा टाकला. कारखान्यातून एमडीसह रसायने व साहित्य जप्त प्रयागराज येथील कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात तयार एमडी, एमडी तयार करण्यासाठी लागणारे MMA (Mono methylamine),Acetone, Hydrochloric Acid,Chloroform यांसह विविध रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त करण्यात आले. तसेच फ्लास्क,हिटिंग मेंटल,ड्रायिंग फनेल,थर्मामीटर आदी साहित्यही पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांच्या माहितीनुसार,या संपूर्ण कारवाईत आतापर्यंत ६४ किलो ७५९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून,त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. एमडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन,लॅब साहित्य आणि इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. २१ आरोपी अटकेत; आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय या प्रकरणात नालासोपारा,मुंबई,कल्याण,नेरळ,जळगाव,गुजरात आणि उत्तर प्रदेश येथून एकूण २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी संघटित टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थाचा व्यवसाय करत असल्याचे तपासात समोर आले आहे. या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता तपासली जात असून,पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ही धडक कारवाई पोलिस आयुक्त निखिल कौशिक, अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे,पोलिस उपआयुक्त संदीप डोईफोडे आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४च्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटला हादरा बसला असून,एमडी तयार करणारा कारखानाच उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपासात या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.