पर्यावरण संवर्धनातील २७ वर्षांच्या कार्याची राष्ट्रीय दखल;डॉ.प्रशांत सिनकर यांचा गौरव
ठाणे:- पर्यावरण संवर्धनासाठी गेली २७ वर्षे सातत्याने कार्य करणारे ठाण्यातील पर्यावरण अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत रवींद्र सिनकर यांच्या उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील दीर्घकालीन कार्याची इंडियन नॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली असून त्यांना गौरव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. डॉ.सिनकर यांनी जलसंधारण,हवामान बदल,जैवविविधता संवर्धन,वृक्ष संरक्षण,नद्यांचे जतन,शाश्वत शहरी विकास आणि पर्यावरण जनजागृती या विषयांवर गेली २७ वर्षे सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन,संशोधन आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. पर्यावरण संरक्षण हा प्रत्येक नागरिकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा,या उद्देशाने त्यांनी व्यापक जनजागृती केली आहे. ठाणे शहरातील वाढते काँक्रीटीकरण,हरित क्षेत्रांचे संवर्धन,पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपाययोजना,हवामान बदलाचे परिणाम आणि जैवविविधतेचे संरक्षण या विषयांवर त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण भूमिका मांडली आहे. त्यांच्या अनेक पर्यावरणपूरक सूचना शासन आणि स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचल्या असून त्याची दखलही घेण्यात आली आहे. प्रदान करण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रात पर्यावरणाप्रती असलेली त्यांची निष्ठा,समाजहितासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य आणि शाश्वत विकासासाठी दिलेले योगदान यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय सन्मान एकोहग एलएलसी (अमेरिका-भारत) यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात आला आहे. या राष्ट्रीय गौरवामुळे ठाण्यासह महाराष्ट्राच्या पर्यावरण क्षेत्राचा सन्मान उंचावला असून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या अनेकांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.