शिरूर ( प्रतिनिधी )
९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या वतीने क्रांतीवीर विष्णू गणेश पिंगळे यांच्या बलिदानाला मानाचा मुजरा करण्यात आला.
सर्वप्रथम प्रशालेत हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी बँड पथकाच्या तालावर तळेगाव ढमढेरे येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकात जाऊन मानवंदना दिली. यावेळी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळ्यास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे संचालक व विद्या सहकारी बँके संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी त्यांनी बोलताना विष्णू गणेश पिंगळे यांची देशभक्ती त्याग आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून दिले. विष्णू गणेश पिंगळे हे गदर चळवळीशी संबंधित होते आणि भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीची तयारी करत होते. त्यांनी परदेशात जाऊ भारतीय क्रांतिकारकांशी संपर्क साधला आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी संघटन व प्रचाराचे काम केले 1915 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर लाहोर कट प्रकरणात खटला चालवण्यात आला. 16 नोव्हेंबर 1915 रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली. देशाचे स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागआणि बलिदान आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे महाराष्ट्राच्या क्रांतिकारी परंपरेतील एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते त्याची आठवण आपण सर्वांनी ठेवावी असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे आणि सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र भुजबळ यांनीही विष्णू गणेश पिंगळे यांच्या कार्याला उजाळा दिला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे उपप्राचार्य सुनीता पिंगळे ग्राम विस्तार अधिकारी चेतन वाव्हळ, तळेगावच्या रोहिणी तोडकर,सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ, उद्योजक सोमनाथ ढमढेरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना गोरे यांनी केले, आभार नंदा सातपुते यांनी मानले.