श्री शाहू मंदिर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मोफत नेत्र तपासणी व दंतचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
फुलगाव (गौतम पाटोळे) :- श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या उद्देशाने मोफत नेत्र तपासणी व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरासाठी एस.व्ही.एस.सी.आय केअर सेंटरच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये डॉ.सुरेश शर्मा,डॉ.वर्धा कुलकर्णी, डॉ.श्रद्धा भांडे,श्रीमती सरिता तसेच डॉ.ऋग्वेद यांनी उपस्थितांची नेत्र व दंत तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. त्यांच्या सेवाभावी योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.राणी शितोळे,(रासेयो कार्यक्रमा आधिकारी) प्रा. भाऊसाहेब जाधव,(रासेयो कार्यक्रमा आधिकारी)डॉ. एस. पी. शेंडे,(राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख,)डॉ.नेहा नलवडे (विद्यार्थी विकास अधिकारी) तसेच महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी विद्यार्थ्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा,असे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविण्यात येणारे असे सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी,आरोग्य जागरूकता आणि सेवाभावाची भावना दृढ करतात,असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध काम करून मोलाची जबाबदारी पार पाडली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.