७३ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी भागीदाराला अटक...१४ दिवसांची पोलीस कोठडी मागणी
ठाणे:- ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ७३ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मे. एकदंत हाऊसिंग या भागीदारी संस्थेचा भागीदार हसमुख सुरजनी शाह (वय ५६) याला अटक केली असून न्यायालयाकडे त्याच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,सन २०१८ ते २०२३ या कालावधीत मे. एकदंत हाऊसिंगमधील भागीदारीचा गैरफायदा घेत फिर्यादीच्या बनावट सह्या करून संस्थेच्या बँक खात्यातील रक्कम स्वतःच्या तसेच नातेवाईक व संबंधित संस्थांच्या खात्यांमध्ये वळविण्यात आली. या प्रकारामुळे संस्थेचे सुमारे ७३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०,४०६,४६७,४६८,४७१ आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी शाह याला त्याच्या विष्णूनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी हा या गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय असून,बनावट सह्यांबाबत अधिक चौकशी,आर्थिक व्यवहारांचा मागोवा,लाभार्थींची माहिती तसेच इतर संभाव्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात नमूद केले आहे. आरोपी चौकशीत अपेक्षित सहकार्य करत नसल्याचाही दावा तपास यंत्रणेने केला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक व विश्वासघाताशी संबंधित अन्य गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक मंदार लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.