• Total Visitor ( 670299 )
News photo

कल्याणातील ऐतिहासिक भटाळे तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटींचा निधी द्या;माजी आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Raju Tapal publisher July 17, 2026 56

कल्याणातील ऐतिहासिक भटाळे तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटींचा निधी द्या;माजी आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी





कल्याण :- कल्याण शहराच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भटाळे तलावाचे पुनरुज्जीवन,सुशोभीकरण आणि विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले आणि भटाळे तलावाच्या जतन - संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,कल्याणच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भटाळे तलावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याच परिसरात पूर्वी ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी विस्तीर्ण भटाळे तलाव अस्तित्वात होता. मात्र कालांतराने या तलावात मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आल्याने तसेच अतिक्रमण झाल्याने तलावाचे मूळ स्वरूप नष्ट होत चालले असून आज तलाव शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच तलावामध्ये हळूहळू बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे सांगत जनावरांचे मलमूत्र तसेच सांडपाणीही सोडले जात आहे. परिणामी तलावातील पाणी प्रदूषित झाले असून पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. इतिहास आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने महत्त्व असलेल्या या तलावाचे संवर्धन,संरक्षण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत तलावाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे,अशी मागणी पवार यांनी केली आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून भटाळे तलावाचे पुनरुज्जीवन आणि विकासकामे तातडीने हाती घेण्यात यावीत,अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement