टिटवाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी...
चोरी करणाऱ्या दोन चोरांना २४ तासाच्या आत अटक
राजू टपाल
टिटवाळा:- कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर येथील जी.आर.पाटील शाळेत झालेल्या चोरी प्रकरणातील २ आरोपीना ताब्यात घेण्यास टिटवाळा पोलिसांना यश आले असून २४ तासाच्या आत २ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि,इंदिरानगर येथील जी.आर.पाटील या शाळेत शाळेचे संस्थापक सुनील गोरख पाटील यांनी शनिवारी दुपारी आय.टी. परीक्षाकरिता अंबरनाथ येथील प्रवीण कुमार यांचे अल्फा कॉम्प्युटर्स मधून तब्बल ३५ कॉम्प्युटर्सचा पूर्ण सेटअप भाडे तत्त्वावर आणून तो शाळेच्या आय.टी. लॅब मध्ये बसवला होता. दरम्यान शनिवारी शाळेचे वॉचमन विजय कुमार यादव याने शाळा सुटल्यावर सर्व वर्ग खोल्या बंद करून आपल्या घरी गेला होता. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी साडे ६ वाजता शाळेचा वॉचमन विजय कुमार यादव याने शिक्षक आदर्श संजय पांडे यांस फोन करून सांगितले कि शाळेच्या आय.टी.लॅब रूम चे लॉक तुटलेले असल्याचे व शाळेतील सीसीटिव्ही तुटलेले असल्याचे सांगितले असता आदर्श पांडे यांनी शाळेच्या जवळच राहणारे आपले सह शिक्षक कृष्णकांत आगे यांना हि शाळेत बोलावून घेत पाहणी केली असता शाळेत आणलेले ६ मॉनिटर ९ सिपीयू चोरी जाण्याबरोबरच कँटीन मधील २ कुकर,१ तवा,१ इडलीचे भांडे,१ मिक्सर,१० छोटे मोठे टोप असे मिळून २ लाख १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तसेच शाळेच्या समोर असलेल्या सुधीर कमथी यांच्या पान टपरी देखील शटर उचकटवुन ६ हजार रुपये चोरून नेल्याचे समजले. याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी आपले सहकारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन मुदगन व सहकाऱ्यांसह पानटपरी मध्ये सापडलेल्या आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून इंदिरानगर नेपाळ पाडा येथील आरोपी नितीन गवारी व गणेश ताब्राकर या दोघांना २४ तासाच्या आत अटक करण्यात यश मिळवले. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कस्टडी ठोठावली आहे. दरम्यान आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल व आणखी किती ठिकाणी त्यांनी अश्या प्रकारे चोऱ्या केल्या आहेत याची सखोल माहिती घेत असल्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी सांगितले आहे.