‘सायकल चालवा, शहर वाचवा’- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण-डोंबिवलीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन
कल्याण डोंबिवली महानगरपालिका,पोलीस विभाग आणि बिर्ला कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सायकल दिन तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत “KDMC Steps Towards Sustainability & Safety For Society Buildings” या जनजागृती उपक्रमांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.ही सायकल रॅली रविवार ७ जून २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता कल्याण आणि डोंबिवली येथून एकाच वेळी आयोजित करण्यात येणार असून नागरिकांना पर्यावरण संरक्षण,आरोग्यदायी जीवनशैली आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश त्याद्वारे देण्यात येणार आहे.
कल्याण आणि डोंबिवलीत स्वतंत्र रॅली...
कल्याणमधील सायकल रॅलीची सुरुवात बिर्ला कॉलेज येथून होणार असून महापौर हर्षाली चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.तसेच महापालिकाआयुक्त अभिनव गोयल, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, बिर्ला महाविद्यालयाचे ओ.पी.चितलांगे,पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यासह विविध नगरसेवक आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.तर डोंबिवलीतील रॅली ह.भ.प.संतश्रेष्ठ वै.सावळाराम महाराज क्रिडासंकुल येथून सुरू होणार असून उपमहापौर राहुल दामले,सभागृह नेता वरुण पाटील या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी विविध सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘सायकल चालवा, शहर वाचवा’चा संदेश...
या रॅलीच्या माध्यमातून वाढते प्रदूषण,वाहतूक कोंडी आणि पर्यावरणीय समस्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.“सायकल चालवा, शहर वाचवा” हा संदेश देत नागरिकांना दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापराबाबत प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या ७ मुद्द्यांसाठी व्यापक जनजागृती मोहीम...
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या “KDMC Steps Towards Sustainability and Safety for Society Building” या उपक्रमांतर्गत केवळ सायकल रॅलीच नव्हे तर निवासी सोसायट्यांमध्ये शाश्वत विकास आणि सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.ज्याचा एक भाग म्हणून गेल्या काही महिन्यांत कल्याण डोंबिवलीमध्ये विविध नामांकित गृहसंकुलांच्या सदस्यांसोबत आतापर्यंत ६ चर्चासत्रही यशस्वीरित्या संपन्न झाली आहेत.
या उपक्रमामध्ये पर्यावरणपूरक आणि सुरक्षित सोसायटी संकल्पनेवर भर देण्यात आला असून विविध महत्त्वाच्या विषयांवर सोसायटी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन,सौर ऊर्जा वापर,रेन वॉटर हार्वेस्टिंग,सांडपाणी पुनर्वापर,वृक्षारोपण यासह निवासी इमारतींमध्ये वाढत्या दुर्घटना टाळण्यासाठी इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट आणि फायर सेफ्टी उपाययोजना या ७ प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील निवासी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने जनजागृती निर्माण करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. तसेच पर्यावरणपूरक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यवस्था उभारण्यासाठी सोसायट्यांना मार्गदर्शनही करण्यात येत असल्याची माहिती प्रशांत भागवत यांनी दिली.
शहरातील निवासी संस्थांचा मोठा सहभाग लक्षात घेता,शाश्वत विकासामध्ये सोसायट्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा महापालिकेचा मानस असून सायकल रॅलीद्वारे याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
रॅलीसाठी विशेष मार्ग निश्चित
कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये रॅलीसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले असून प्रमुख चौक,रस्ते आणि सार्वजनिक भागातून ही रॅली मार्गक्रमण करणार आहे.कल्याणातील सायकल रॅली बी.के.बिर्ला महाविद्यालयापासून सुरू होऊन कल्याण पश्चिमेतील प्रमुख चौक आणि भागातून फिरून पुन्हा बिर्ला महाविद्यालय परिसरात समाप्त होणार आहे.तर डोंबिवलीतील सायकल रॅली ही ह.भ.प.संतश्रेष्ठ वै.सावळाराम महाराज क्रिडा संकुलातून सुरू होऊन डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेतील प्रमुख चौकातून पुन्हा क्रिडा संकुलामध्ये येऊन समाप्त होणार असल्याची माहिती सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांनी दिली आहे.
सहभागींना टी-शर्ट, आणि मेडल...
गुगल फॉर्मद्वारे नाव नोंदणी करणाऱ्या सहभागी सायकलस्वारांना आयोजकांकडून टी-शर्ट, मेडल आणि अल्पोपहार देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
या उपक्रमामध्ये कल्याण सायकलिस्ट ग्रुप, डोंबिवली सायकलिस्ट ग्रुप,बाईक पोर्ट सायकलिस्ट ग्रुप,एव्हरग्रीन सायकलिस्ट ग्रुप,पलावा सायकलिस्ट ग्रुप, हिरकणी महिला सायकल क्लब डोंबिवली,पेडल रिपब्लिक सायकल क्लब डोंबिवली यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी सायकलपटू सहभागी होणार असून इतर नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9323865233.