जेष्ठ नागरिकांचाही महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या जनजागृती अभियानात सहभाग !
कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांनी मतदान करावे या करिता महापालिकेच्या स्वीप टिममार्फत स्वीप टिमचे समन्वय अधिकारी संजय जाधव आणि सहा.समन्वय अधिकारी विजय सरकटे यांच्यामार्फत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने काल जेष्ठ नागरिक सेवा संस्था,कल्याण यांच्यामार्फत मतदानाची टक्केवारी वाढावी या करिता भव्य स्वरुपात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यामध्ये मोठया प्रमाणात जेष्ठ नागरिक,महिला जेष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला. या अभियानामध्ये काटेमानिवली नाका,पुना लिंक रोड व ड प्रभाग विजय नगर,तिसगाव नाका,म्हसोबा चौक,कोळसेवाडी या मार्गाने जनजागृतीपर रॅली काढण्यात येऊन या रॅलीचा समारो महापालिकेच्या शाळा क्र.15 येथे करण्यात आला. यावेळी स्वीपचे सहा. समन्वय अधिकारी विजय सरकटे यांनी उपस्थित नागरिकांना मतदानाबाबत मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थित नागरिकांना सामूहिक मतदान शपथ देण्यात आली. सदर रॅली मध्ये ध्वनीक्षेपकाच्या व्दारे मतदान जनजागृतीपर घोषणा देऊन व गीताच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. हे अभियान यशस्वी करण्यासाठी समाधान मोरे व त्यांच्या स्वीप पथकातील इतर कर्मचारी,जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष कालिदास कदम,सचिव डी.आर.उंबरकर,उपाध्यक्ष दुधराम सहारे,बाळासाहेब बागूल,कार्यध्याक्ष प्रकाश देसाई व इतर मान्यवर जेष्ठ नागरिकांनी सहकार्य केले.