शेतीपंपाचे चालू वीजबील न भरल्याच्या कारणावरून कोंढापुरी येथील शेतक-याच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत ; आमदार अशोक पवार यांना कोंढापुरी येथील शेतक-याचे निवेदन
-----------------
शेतीपंपाचे चालू वीजबील न भरल्याच्या कारणावरून शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतक-याच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा शिक्रापूर येथील महावितरण कर्मचा-याने खंडीत केला.
शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील शेतकरी श्री.विजय संभाजीराव ढमढेरे यांची पाझर तलावावर विद्यूतमोटार असून ढमढेरे यांनी पाईपलाईनद्वारे जवळच असलेल्या शेतात पाझर तलावाचे पाणी नेले आहे.
शेतात १ एकर तोडणीस आलेला ऊस आहे. ऊसाची नोंदणी जातेगाव येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखान्याकडे ४ नोव्हेंबर २०२१ रोजी केलेली आहे. तोडणीस आलेला ऊस १५ महिने होवूनही अद्याप ऊस तोडणी टोळ्या कारखान्याकडून मिळालेल्या नाहीत.
कोंढापुरी येथील शेतकरी श्री.विजय संभाजीराव ढमढेरे यांनी त्यांना मिळालेले शेतीपंपाचे वीजबील २९ हजार ३७० रूपये एकरकमी दि.२९ नोव्हेंबर २०२१ रोजी रांजणगाव गणपती येथील संपदा पतसंस्थेत एकरकमी भरले. त्यानंतर महावितरणचे कोंढापुरी येथील लाईनमन लक्ष्मण खरसडे यांनी शेतकरी श्री.विजय संभाजीराव ढमढेरे यांच्या व्हाट्स अँप मोबाईल नंबरवर १० हजार ७९० रूपयांचे शेतीपंपाचे चालू वीजबील नुकतेच पाठविले.
शेतीपंपाचे चालू वीजबील न भरल्याच्या कारणावरून लाईनमन लक्ष्मण खरसडे यांनी शनिवार दि.२६/०२/२०२२ रोजी शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला.
शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केल्याचे शेतकरी श्री विजय ढमढेरे यांना समजल्यानंतर ढमढेरे यांनी लाईनमन लक्ष्मण खरसडे यांना खरसडे यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून वीजपुरवठा खंडीत करण्याच्या कारणाविषयी विचारले असता १० हजार ७९० रूपयांचे शेतीपंपाचे वीजबील भरा असे सांगून वीजपुरवठा खंडीत केल्याचे सांगितले.
ब-याच शेतक-यांकडे पन्नास पन्नास हजार, लाख, दीड लाख रूपयांची थकबाकी असताना फक्त चालू वीजबील न भरलेल्या शेतक-यावरच अन्याय कसा काय ? असा प्रश्न शेतकरी विजय ढमढेरे यांनी उपस्थित केला.
सध्या थकबाकीदार शेतक-यांसाठी वीजपंपाची थकबाकी मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के भरल्यास उर्वरित वीजबील माफ होवून शेतक-यांना वीजबील कोरे करण्याची संधी शेतक-यांना मिळणार असा प्रचार महावितरणकडून केला जात आहे.
शेतक-यांना दिलेली वीजबीले ५० टक्के कमी करून आलेली आहेत असे महावितरण कर्मचा-यांकडून शेतक-यांना सांगितले जाते. शेतक-यांना दिलेल्या शेतीपंपाच्या वीजबीलांत ५० टक्के सवलत दिल्याचे लिहिलेले दिसून येत नाही. शेतक-यांनी थकबाकी मार्च २०२२ पर्यंत न भरल्यास शेतक-यांना मार्च २०२२ नंतर ५० टक्के वीजबील वाढवून देणार का ? असा सवाल शेतकरी विजय ढमढेरे यांनी केला आहे. शेतक-यानी थकबाकी भरलेली नसताना ५० टक्के वीजबील कमी करून कसे ? असाही प्रश्न शेतकरी विजय ढमढेरे यांनी केला आहे.
आलेले वीजबील भरायला गेल्यानंतर अगोदर शेतक-यांनी महावितरण कार्यालयात जावून वीजबील महावितरण अधिकारी,कर्मचा-यांकडून कमी करून घेवून नंतरच वीजबील बँकेत जमा करावयाचे असे असावयास हवे असे ढमढेरे यांनी सांगितले.
थकबाकी नसताना फक्त चालू वीजबील असताना वीजपुरवठा महावितरण कर्मचा-याने खंडीत केल्यानंतर उद्विग्न होवून शेतकरी विजय ढमढेरे यांनी शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ऍड. अशोकबापू पवार यांच्या मेलवर तक्रारी अर्ज पाठविला आहे.
तोडणीस आलेल्या ऊसाची तोडणी झालेली नसताना तसेच थकबाकी नसताना ,फक्त चालू १० हजार ७९० रूपयांचे शेतीपंपाचे वीजबील असताना वीजपुरवठा खंडीत करणे कितपत योग्य ? असे आमदार अशोकबापू पवार यांना मेलवर पाठविलेल्या तक्रारी अर्जात शेतकरी श्री.विजय ढमढेरे यांनी नमूद केले आहे.
फक्त चालू वीजबील असताना खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू करू नये असेही शेतकरी विजय ढमढेरे यांनी लाईनमन लक्ष्मण खरसडे यांना मोबाईल फोनवरून सांगितले.