पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन
“सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है!” हे गाणे स्पीकरवर लावून सरकारचा केला निषेध
पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून “साठेबाज” म्हणून हिणवणूक; माजी आमदार वैभव नाईक
परराष्ट्र धोरण आखण्यात मोदींना अपयश; माजी आमदार जीजी उपरकर
सिंधुदुर्ग:-पेट्रोल डिझेलमध्ये सातत्याने होणाऱ्या दरवाढी विरोधात आज माजी आमदार,जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरात कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व युवासेनेच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी वाढत्या महागाईवर भाजप आमदार यांनी म्हटलेले "सखी सैंया तो खूब ही कमात हैं,महंगाई डायन खाए जात है!" हे गाणे आणि पंतप्रधान मोदींनी महागाई विरोधात केलेली जुनी भाषणे सायकलला स्पीकर लावून वाजविण्यात आली. वैभव नाईक यांनी ती सायकल हातात घेऊन कुडाळ शिवसेना शाखा ते जिजामाता चौक येथून एसटी स्टॅन्ड पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दरवाढीचा निषेध करण्यात आला. कहा गये,कहा गये,अच्छे दिन कहा गये! पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो! रद्द करा,रद्द करा पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा!,पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत! अशा आशयाचे फलक झळकविण्यात आले. आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.