टिटवाळा नगरीत टेलिस्कोप मधून विद्यार्थ्यांनी अनुभवले आकाशाचं अनोखं दर्शन
The Science Point- Activity Adda टिटवाळा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे, The Young Scientist Den बदलापूर तर्फे काल रात्री (दि. 1फेब्रुवारी) रोजी घोटसई येथील सरस्वती विद्यालय प्रांगणात शनिवारी आकाशदर्शन संपन्न झाले. व्हाट्सअप्प मधून मिळणाऱ्या अपुऱ्या (आणि बऱ्याचदा फसव्या) ज्ञानातून बाहेर पडून प्रत्यक्ष ग्राहगोल, तारे , नक्षत्र आणि राशी पाहताना मुलं आणि पालक सर्वांनाच विलोभनीय अनुभव आला. या अफाट विश्वात आपल्या पृथ्वीचं स्थान, आपली सूर्यमाला, आकाशगंगा आणि संपूर्ण विश्व यांची तुलनात्मक माहिती पाहताना अनेक विद्यार्थी आणि पालक आश्चर्यचकित झाले होते.
कार्यक्रमपूर्वी किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना काही विज्ञानाचे चमत्कार दाखवले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज सांगितली. आकाशदर्शनाची प्राथमिक माहिती दिल्यानंतर प्रत्यक्ष टेलिस्कोपमधून शनि, शुक्र ग्रह, गुरू आणि गुरुचे उपग्रह सुद्धा,चंद्राची कोर आणि लेसरच्या मदतीने अवकाशात असणारे तारकापुंज असा विश्वाचा अद्भुत नजारा पाहून विद्यार्थी आवाक् होत होते.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची प्रकाश पारखे सर यांनी सोप्या आणि त्यांना समजेल अशा शब्दांत उत्तरे दिली. टिटवाळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी The Science Point (9321244819) कडून नेहमीच असे वेगवेगळे वैज्ञानिक उपक्रम राबवले जातात.
उपक्रमाला टिटवाळा शहर आणि परिसरातील विविध विद्यालयातील विद्यार्थी, पालक, The Science Point Activity Adda चे किशोर पाटील, महा अंनिसचे पदाधिकारी किरण ईशी, सरस्वती विद्यालयाचे शिंगोळे सर , The Young Scientist चे कार्यकर्ते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एका विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया
काय भारी दिसत होतं, आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात असंच दिलेलं आहे पण हे सर्व प्रत्यक्ष पाहताना खूपच मज्जा आली. मला नक्षत्र आणि तारकापुंज आता कायम लक्षात राहतील. - आरुष पाटील