संविधानिक पदावर नसतानाही नरेंद्र पवार यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे कौतुकास्पद - उपमहापौर राहुल दामले
भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यअहवालाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन
कल्याण:- कोणत्याही संविधानिक पदावर नसतानाही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची यादी पाहता त्यांनी “विकास” हा शब्द केवळ बोलण्यात नाही,तर कृतीतून सिद्ध करून दाखवला असल्याचे गौरवोद्गार कल्याण डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले यांनी काढले आहेत. भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. त्यावेळी उपमहापौर राहुल दामले यांच्यासह अनेकांनी पवार यांच्या सामाजिक कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र पवार हे प्रत्येक कल्याणकराच्या सुख-दुःखात ते सहभागी होत असतात. कोणताही घरगुती,किंवा कौटुंबिक सोहळा असो किंवा कोणताही सामाजिक प्रसंग ते नेहमीच जनतेसोबत खांद्याला खांदा लावून उभे असतात. हेच त्यांचं खरं नेतृत्व आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने नरेंद्र पवार म्हणजे कल्याण, आणि कल्याणची जनता म्हणजे नरेंद्र पवार. त्यांचं आणि कल्याणचं नातं हे केवळ राजकीय नाही,तर भावनिक आणि जिव्हाळ्याचं असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 ते 2019 या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे झाली. तब्बल 250 कोटी रुपयांचा निधी त्यांनी केवळ कल्याणच्या विकासासाठी आणला. त्या काळात रस्ते, पायाभूत सुविधा,विविध विकास प्रकल्प यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. यानंतर कोरोना सारख्या कठीण आणि संकटाच्या काळातही नरेंद्र पवार यांनी जीव तोडून आणि जीव धोक्यात घालून केलेले काम हे सर्वच कल्याणकरांनी पाहिलं आहे. त्या काळात त्यांनी राजकारण नाही,तर केवळ मानवतेची सेवा केली लोकांच्या मदतीसाठी ते दिवस-रात्र झटले. त्यांचा हा उत्साह,ही ऊर्जा आजही तशीच कायम असल्याची पोचपावतीही उपमहापौर राहुल दामले यांनी यावेळी दिली. तर,एखाद्या संविधानिक पदावर असताना विकासकामांसाठी निधी आणणं काही प्रमाणात सोपं असतं. आपले पद निघून गेले की अनेकजण समाजातून आल्यापावली माघारी निघून जातात. पण नरेंद्र पवार यांनी अजिबात तसे न करता कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता लोकाभिमुख काम सुरूच ठेवले. ही खरोखर सोपी गोष्ट नसल्याचे मत यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संरक्षिका गीताताई गुंडे यांनी कार्यअहवाल प्रकाशनावेळी व्यक्त केले. तसेच नरेंद्र पवार यांनी आपल्या इतक्या वर्षांच्या सामाजिक कार्यातून इथल्या जनतेच्या मनामध्ये एक अढळ आणि कायमस्वरूपी टिकून राहणारे असे स्थान निर्माण केले आहे. त्यासाठी जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी आणि मनामध्ये जिद्द चिकाटी असावी लागते. या कार्य अहवालातील विकासकामांची भलीमोठी यादी पाहता हे सर्व गुण नरेंद्र पवार यांच्यामध्ये असल्याशिवाय ही कामे प्रत्यक्षात उतरली नसल्याचे सांगत गीताताई गुंडे त्यांनी नरेंद्र पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्य अहवालातून उमटली सामाजिक कार्यकर्तृत्वाची छटा...माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या या कार्यअहवालात त्यांनी आतापर्यंत केलेलं अनेकविध सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,कला - क्रीडा उपक्रमांसह कल्याणातील नागरी समस्या,नागरिकांचे विविध प्रश्न -अडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारी केलेला यशस्वी पाठपुरावा,नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या अनेक लहान मोठ्या मुद्द्यांवर घेतलेली लोकाभिमुख भूमिका आणि स्वतःहून पुढाकार घेऊन सुरू केलेली विकासकामे अशा सर्वंकष मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ज्याद्वारे नरेंद्र पवार यांच्या सामाजिक कार्यकर्तृत्वाची छटा लोकांसमोर उलगडण्यात आल्याची प्रतिक्रिया शहरातील मान्यवर व्यक्तींनी प्रकाशनानंतर व्यक्त केली. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संरक्षिका गीताताई गुंडे,कल्याण डोंबिवलीच्या महापौर ॲड. हर्षाली थविल चौधरी,उपमहापौर राहुल दामले,आमदार सुलभा गायकवाड, आमदार महेश चौगुले,भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब,भाजप गटनेते शशिकांत कांबळे,उल्हासनगर विधानसभा प्रभारी माजी नाना सूर्यवंशी यांच्यासह स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर,माजी नगरसेवक सुनिल वायले,नगरसेविका शालिनी वायले,नगरसेवक अमित धाक्रस, नगरसेवक शामल गायकर,नगरसेविका विजया पोटे,नगरसेविका हेमलता पवार,नगरसेविका मेघा खेमा,नगरसेवक रुपेश सकपाळ,कल्याण जनता बँक अध्यक्षा ॲड.संपदा कुलकर्णी,भाजपा जिल्हा सरचिटणीस निखिल चव्हाण,भाजपा नवीन मंडल अध्यक्ष स्वप्निल काठे,अनिल बोरनारे,सदानंद कोकणे,जनार्दन कारभारी सर्वपक्षीय नगरसेवक,भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.