• Total Visitor ( 695415 )
News photo

पुणे जिल्हा क्रीडा समितीची प्रथम सभा तळेगाव ढमढेरे येथे उत्साहात संपन्न

Raju Tapal publisher August 20, 2026 63

पुणे जिल्हा क्रीडा समितीची प्रथम सभा तळेगाव ढमढेरे येथे उत्साहात संपन्न



तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाने केले  यशस्वी आयोजन 



शिरूर (प्रतिनिधी:-विजय ढमढेरे):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि तळेगाव ढमढेरे( ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीची प्रथम सभा तळेगाव ढमढेरे येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. विभागीय क्रीडा समितीच्या प्रथम सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.देविदास वायदंडे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक सुदाम शेळके आधी यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे स्वागताध्यक्ष आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे मानस सचिव अरविंददादा ढमढेरे,विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे या प्रथम सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सचिव अमेय काळे,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी,विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य डॉ. रमेश गायकवाड आदी मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे यजमानपद सलग दुसऱ्यांदा भूषविण्याचा बहुमान साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयास प्राप्त झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७  मधील प्रथम सभेसाठी पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ८० क्रीडा संचालक उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य आणि राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे माजी क्रीडा संचालक प्रा.डॉ.दत्तात्रेय रघुनाथ पाचारणे यांचे नुकतीच निधन झाले. त्या प्रसंगी त्यांना सर्वानुमते आदरांजली अर्पण करण्यात आली. याशिवाय पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा अहवालाही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.  शैक्षणिक वर्ष २०२५-२६  मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल डॉ.सुनील पानसरे व प्रा.रणजीत देवकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी या भूमिकेतून सभेस संबोधित करताना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे म्हणाले की,महाविद्यालयीन जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांना अभ्यासाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीची देखील तितकीच आवश्यकता असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे इतर विद्यापीठाच्या तुलनेत क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत कायम अग्रेसर आलेले आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सातत्याने राबविल्या जात असलेल्या विविध स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम पूरक राहिलेले आहेत. अनेक महाविद्यालयातील क्रीडाविषयक सोयी सुविधांसाठी आणि त्यातील युवकांच्या सहभागासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सातत्याने सकारात्मक भूमिका घेत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांवर भर देणे गरजेचे असल्याचे प्राचार्य देविदास वायदंडे यांनी यावेळी  सांगितले. युवकांच्या क्रीडाविषयक सर्वांगीण विकासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा आणि योजनांचा प्राचार्य डॉ.वायदंडे त्यांनी यावेळी आढावा घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉ.सुदाम शेळके यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालय संयुक्तपणे राबवित असलेल्या विविध क्रीडाविषयक योजनांचा त्यांनी आढावा घेतला. अध्यक्षीय मनोगत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष व साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे यांनी व्यक्त केले. विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती निश्चितपणे विद्यापीठाच्या लौकिकात भरच टाकेल असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये जाणाऱ्या विविध  स्पर्धा आणि उपक्रमांचे सुतोवाच प्राचार्य डॉ.मुसमाडे यांनी याप्रसंगी केले. पुणे जिल्हा विभागीय समितीच्या प्रथम सभेचे स्वागताध्यक्ष अरविंददादा ढमढेरे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.पराग चौधरी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या प्रथम सभेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी काही नियुक्ती यावेळी घोषित करण्यात आल्या. त्यानुसार कळंब - वालचंदनगर येथील विश्वासराव रणशिंग महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. सुहास भैरट यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. तर सहसचिवपदी डॉ.शीतल शेंडकर ( अमृतेश्वर महाविद्यालय,विंझर),डॉ. अक्षय काशीद (मगनमल उधाराम महाविद्यालय,पिंपरी),डॉ.गणेश चव्हाण (राजमाता जिजाऊ महाविद्यालय,भोसरी),आणि डॉ.  विकास शेलार (कला,वाणिज्य महाविद्यालय,दौंड)आदी मान्यवरांची एक मताने नियुक्ती करण्यात आली. प्रा.डॉ. संदीप सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा समितीचे सचिव प्रा.डॉ.अमेय काळे यांनी आभार मानले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026