उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे,भाजपा नेते नितीन भुतडा यांची भूमिका स्वागतार्ह - ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांची प्रतिक्रिया
शिरूर :- जळीत ऊसाला सुपर करण्याची परवानगी द्यावी,जळीत ऊसाला सुद्धा फ्रेश ऊसाचा दर लागू करावा, ऊसाची तात्काळ तोड करून वहन करावे, ऊस उत्पादकांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी उपाययोजना करावी अशा मागण्या उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन भुतडा यांनी उमरखेड व महागाव तालुक्यात कार्यरत असलेल्या साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत केल्या.
ऊस तोडणी कामगार पळून गेल्यास शेतकरी व वहनमालक यांना बसणा-या आर्थिक भुर्दंडाची हमी संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांनी घ्यावी, ज्या परिसरात हार्वेस्टिंग मशीन आहे तेथील पूर्ण ऊस तोड झाल्याशिवाय हार्वेस्टिंग मशीन तेथून हलवू नये, शेतक-यांच्या ऊसाचे पेमेंट ऊस वहन झाल्यानंतर १५ दिवसांत देण्यात यावे ,तोड मशीन व क्रेन हार्वेस्टरची संख्या वाढविण्यात यावी अशाही मागण्या उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे व भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन भुतडा यांनी केल्या.
एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या या बातमीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी म्हटले आहे, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उमरखेड चे आमदार किसनराव वानखेडे व भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन भुतडा यांनी घेतलेली भुमिका ऊस उत्पादक शेतक-यांच्या दृष्टीने योग्य असून स्वागतार्ह आहे.
ब-याच वेळा शेतक-यांच्या शेतातील ऊसाची तोडणी लवकर व्हावी यासाठी ऊसतोडणी कामगारांकडून ऊसाची तोडणी जळीत करून शेतक-यांच्या शेतातील ऊस कारखान्यांकडे पाठविला जातो. ब-याच वेळा ऊस तोडणी हंगामात बिबटे,बिबट्यांची पिल्ले ऊसाच्या फडांमध्ये आश्रय घेत असतात. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांमध्ये तसेच ऊस उत्पादक शेतक-यांमध्येही भीतीचे वातावरण पसरलेले असते. त्यामुळेही ऊसाची तोडणी जळीत करून जळीत ऊस कारखान्यांकडे पाठविला जातो. कारखान्यांकडून जळीत केलेल्या ऊसाला कारखान्याने जाहीर केलेल्या दरापेक्षा कमी दर मिळतो. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत असते. जळीत केलेला ऊस कारखान्यांकडे पाठविण्यास उशीर झाल्यास ऊसाच्या वजनातही घट होते. वजनात घट झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांचे तसेच ऊस तोडणी कामगारांचेही आर्थिक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन भुतडा या्ंनी ऊस उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नांसंदर्भात घेतलेली भुमिका योग्य तसेच स्वागतार्ह असल्याचे शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांनी म्हटले आहे.