श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील चिमण्यांचे संवर्धन उपक्रम कौतुकास्पद - विजय ढमढेरे यांची प्रतिक्रिया
शिरूर :- शिरूर तालुक्यातील श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री.पांडूरंग विद्यामंदिर विद्यालयात "चिमण्यांचे संवर्धन" हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून राबविला जात आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचे धडे शिकवण्याचे काम विठ्ठलवाडी येथील श्री.पांडूरंग विद्यामंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, पर्यावरण विभाग प्रमुख प्रवीण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होवून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनविणे ,एक घास चिऊचा, एक घास काऊचा असे म्हणत धान्य जमा करण्याचेही काम विद्यार्थी करत असतात. जमा केलेले धान्य उन्हाळ्यात पंचक्रोशीतील गावांमध्ये चिमण्यांसाठी पुरवले जाते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेलेली कृत्रिम घरटी विद्यालयाच्या व्हरांड्यात बसविण्यात आल्याने चिमण्यांचे संवर्धन केले जात आहे
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर तालुका माजी संचालक विजय ढमढेरे यांनी म्हटले आहे, शिरूर तालुक्यातील श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी येथील विद्यालयाच्या वतीने गेल्या १० वर्षांपासून राबविण्यात येत असलेला उपक्रम कौतुकास्पद असून वाढती उष्णता, उन्हाळ्याच्या दिवसांतील पाण्याचे दुर्भिक्ष,वाढते प्रदुषण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे.दिवसेंदिवस पक्ष्यांचीही संख्या कमी होत आहे.आजच्या पिढीवर निसर्ग संवर्धनाचा संस्कार होण्याच्या दृष्टीने श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री.पांडूरंग विद्यामंदीर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, पर्यावरण विभाग प्रमुख प्रवीण जगताप यांनी विठ्ठलवाडी येथील विद्यालयात राबविलेला 'चिमण्यांचे संवर्धन' उपक्रम कौतुकास्पद !