जखम मनाची…गरज मायेची! मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा पुढाकार; पथनाट्ये, पोस्टर प्रदर्शन आणि रॅलीतून संवेदनशीलतेचा संदेश
प्रशांत सिनकर
ठाणे : प्रतिनिधी मानसिक आजारांवर औषधोपचारांसोबत प्रेम,आपुलकी आणि समजून घेणाऱ्या माणसांची साथही तितकीच महत्त्वाची आहे. मानसिक आजारांविषयीचे गैरसमज दूर करून रुग्णांना सन्मानाने जगण्याचा आधार मिळावा,या उद्देशाने प्रादेशिक मनोरुग्णालय,ठाणे यांच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. पथनाट्ये, पोस्टर प्रदर्शन आणि जनजागृती रॅलीच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत संवेदनशीलता वाढविण्याचा संदेश देण्यात आला.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, मानसिक आरोग्य आढावा मंडळ, ठाणे, आर.डी.सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके आणि प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजनकर यांचीही विशेष उपस्थिती होती.
पोस्टर प्रदर्शन आणि पथनाट्यांतून जनजागृती यंदाच्या ‘Lived Experiences, Heard Real Voices, Real Change’ या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मानसिक आरोग्यविषयक पोस्टर प्रदर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर रुग्णालयातील सिस्टर इन्चार्ज आणि डीपीएन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन पथनाट्ये सादर केली.
या पथनाट्यांतून मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव, त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि उपचारांदरम्यान प्रेम व सहकार्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना नाकारण्याऐवजी त्यांना समजून घेऊन आधार देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मानसिक रुग्णांच्या कायदेशीर हक्कांवर मार्गदर्शन प्रमुख पाहुणे आर. डी. सावंत यांनी मानसिक आरोग्य आणि कायदा यांच्यातील संबंध स्पष्ट केले. मानसिक आजारांनी प्रभावित व्यक्तींचे कायदेशीर हक्क, मानवी प्रतिष्ठा आणि त्यांना मिळणाऱ्या संरक्षणाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती ही केवळ एखाद्या दिवसापुरती किंवा सप्ताहापुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
जनजागृती रॅलीतून भेदभाव टाळण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मानसिक आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या या रॅलीतून मानसिक आजारांविषयीचे गैरसमज दूर करणे, रुग्णांशी भेदभाव न करणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सहकार्य करणे, असा संदेश देण्यात आला.
औषधोपचारांसोबत मायेचीही गरज यावेळी बोलताना डॉ. नेताजी मुळीक यांनी मानसिक आरोग्याबाबत समाजाने अधिक संवेदनशील होण्याची गरज व्यक्त केली. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींचे अनुभव,समस्या आणि अडचणी समजून घेऊन त्यानुसार उपचार व सेवांमध्ये आवश्यक बदल करणे महत्त्वाचे आहे. त्यांना प्रेम,आपुलकी आणि सन्मानाने जगण्याचा आधार देणे ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मानसिक आजार हा लपविण्याचा किंवा भेदभाव करण्याचा विषय नसून, समजून घेण्याचा आणि योग्य उपचारांसह माणुसकीची साथ देण्याचा विषय आहे. मनाच्या जखमा भरून काढण्यासाठी औषधांसोबत मायेची फुंकरही आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमांतून अधोरेखित करण्यात आला.