बिबट्याच्या हल्ल्यात निमगाव म्हाळूंगीतील ४ शेळ्यांचा मृत्यू
अण्णापूर येथील ढग्या डोंगरालगतच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत
शिक्रापूर (प्रतिनिधी):- शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील गोठ्यातील शेळ्यांचा गळा तोडून बिबट्याने ताव मारला असतानाच शिरूर शहराजवळील अण्णापूर येथील ढग्या डोंगरालगतच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. निमगाव म्हाळुंगी येथील चौधरी वस्तीवरील घरांतील माणसे कुत्र्यांच्या आवाजाने जागी झाली. माणसांचा आवाज आल्याने मृत शेळ्या जागेवरच सोडून बिबट्याने धूम ठोकली. ४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याने निमगाव म्हाळुंगी येथील चौधरी कुटूंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.बिबट्यांची संख्या जास्त असल्याची शंका चौधरी कुटूंबिय तसेच पोलीस पाटील किरण काळे यांनी व्यक्त केली असून वनपाल गौरी हिंगणे,वनरक्षक प्रमोद पाटील,सरपंच सचिन चव्हाण,पोलीस पाटील किरण काळे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला आहे असे समजते. दरम्यान,शिरूर शहरापासून जवळच असलेल्या अण्णापूर येथील ढग्या डोंगरालगतच्या शेतात मृतावस्थेत आढळून आलेला बिबट्या नर जातीचा असून मृत बिबट्याचे वय दोन ते अडीच वर्षे आहे असे विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजले.