गुजर प्रशालेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शिक्रापूर:- तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बँड पथकाच्या तालावर प्रभात फेरी काढून गावातील प्रमुख ठिकाणी म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय,हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक,क्रांतिवीर चौक,बाजार मैदान,देवपुरी मठ,तलाठी कार्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीताचे गायन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केले. त्याचप्रमाणे प्रशालेतही झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती प्रवीणशेठ गुजर,कल्पना गुजर,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे,शकुंतला फाऊंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई ढमढेरे,माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल,शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,संचालक राहुल गुजर,राजेश ढमढेरे,परेश सातपुते,सामाजिक कार्यकर्ते सचिन पंडित,युवा उद्योजक सोमनाथ ढमढेरे गावातील विविध सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ प्रशालेत झेंडावंदनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संविधान दिनाच्या उद्देशिकेचे वाचन प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी केले. तसेच असाक्षरमुक्त गावाची शपथ गुरुनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे यांनी केले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी समर गीतातून व कृतीयुक्त देशभक्तीपर गीतांतून देशभक्तीचा गजर केला. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ही उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी मानले. कार्यक्रम संपल्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.