अमरावती तालुक विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न
अमरावती :-शिक्षण विभाग पंचायत समिती अमरावती,मुख्याध्यापक संघ,विज्ञान अध्यापक मंडळ,अमरावती तालुका ग्रामीण आणि जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनगाव बारी यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वी अमरावती ग्रामीण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,अंजनगावबारी येथे उत्साहात संपन्न झाले. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन अमरावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनता विद्यालयाचे प्राचार्य विनोद मुगल,प्रमुख अतिथी म्हणून अमरावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, अमरावती जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी इम्रान खान,अमरावती तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र हगवणे, सचिव मोहम्मद एजाज,तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय काळबांडे,सचिव सुनील कडू,अंजनगाव बारी केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन जाधव,केंद्रप्रमुख संजय कोकाटे,उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांनी करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून विज्ञान प्रदर्शनीचा उद्देश आणि भूमिका विशद केली. शिक्षक,विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या अंगी रुजवला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये केल्यास अंधश्रद्धा आपोआप नष्ट होतील आणि त्याचा आपल्या सर्वांना फायदा होईल,यासाठी पालक,शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटक गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी केले. विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांमधून वैज्ञानिक प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली असून सदर प्रदर्शनी ९,१० डिसेंबरला विद्यार्थी पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कु.अर्चना पोकळे यांनी तर आभार रवींद्र हगवणे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता अमरावती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसह माध्यमिक शाळांचे विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनी च्या नियोजनबद्ध आयोजनाकरिता जनता विद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले.