चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ
वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली
आषाढीवर पुराचे सावट
पंढरपुर :- मागील दोन- तीन दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने उजनी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.यामुळे चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिकासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
पंढरपूरची आषाढी यात्रा ६ जुलैला आहे. या अनुषंगाने विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. तर पुढील काही दिवसात भाविकांची गर्दी अधिक होणार असून काही दिवसांनी पायी वारी करणारे वारकरी देखील पंढरपुरात दाखल होतील. मात्र आषाढीच्या तोंडावर चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास चंद्रभागेला पूर राहण्याची शक्यता आहे.