मालवणीमध्ये सिलेंडरचा स्फोट, ७ जण जखमी;सर्वांना रुग्णालयात दाखल
मुंबईच्या मालवणी परिसरात मंगळवारी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. मालवणी गेट क्रमांक ८ जवळ,भारत माता स्कूल (मालाड वेस्ट) जवळ,एसी मशिदीजवळ असलेल्या चाळीत ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार,गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला आणि चाळीत आग लागली. बीएमसी अग्निशमन दलाला (एमएफबी) सकाळी ९:२५ वाजता घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे कर्मचारी,पोलिस,संबंधित वीज वितरण कंपनी, १०८ रुग्णवाहिका आणि बीएमसी वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. आग पहिल्या मजल्यावरील एका खोलीत मर्यादित होती, ज्यामध्ये सिलेंडरचा मुख्य व्हॉल्व्ह,गॅस स्टोव्ह,एलपीजी सिलेंडर,एसी शीट,घरगुती वस्तू,अन्नपदार्थ आणि गाद्या होत्या. अग्निशमन दलाने सकाळी ९:४२ पर्यंत आग आटोक्यात आणली.या घटनेत एकूण ७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. यापैकी चार जखमींना आधार रुग्णालयात आणि तीन जणांना केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत. घटनेचे कारण तपासले जात आहे.