विदर्भात मुसळधार पाऊस;
दोघांचा मृत्यू,
राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई :- राज्याच्या काही भागात उष्णतेने तर काही भागामध्ये अवकाळी पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भात काल (रविवारी) सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. नागपूर शहरात जोरदार पावसाच्या सरीसह गारा पडल्या. गडचिरोलीत शनिवारी रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत 62.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर गोंदिया, भंडारा, वर्धा जिल्ह्यात विजा व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातील सुरगाव परिसरात रविवारी दुपारी सुमारे अर्धा तास बोरांच्या आकाराच्या गारांचा पाऊस पडला. यामुळे केळी पिकासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळीमुळे पावसामुळे पिकाला असा जबर फटका बसला आहे. राज्याच पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून, काही भागात गारपिटीची देखील शक्यता आहे. मुंबईतही 6 आणि 7 मे रोजी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 5 ते 7 मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची शक्यता आहे.
अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये 6 व 7 मे, मराठवाड्यात 7 मे, विदर्भात 5 मे ला अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता वर्तवली आहे, यासंबंधीची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काल (रविवारी) संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. चंद्रपूर शहरातल्या आकाशवाणी परिसरात काल संध्याकाळी वादळामुळे विजेची एक जिवंत तार तुटून रस्त्यावर पडली होती, रात्री या परिसरात सायकलने जाणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे, प्रभाकर शिरसागर (52) असं मृत व्यक्तीचं नाव आहे, तर चिमूर तालुक्यातल्या हिवरा येथे विज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला आहे, विकास ढोरे (45) असं मृत मेंढपाळाचे नाव, शेतात मेंढ्या चराई करत असताना संध्याकाळी विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासह शेतातील पिकांचंही नुकसान झालं आहे.