अमेरिकेत हेलिकॉप्टर नदीत कोसळले;
पायलटसह 6 जणांचा मृत्यू
न्यूयॉर्क :- अमेरिकेत हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये गुरूवारी एक टूरिस्ट हेलिकॉप्टर हडसन नदीत कोसळले. या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमध्ये असणारे पायलटसह सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. मृतांमधील ५ जण हे एकाच कुटुंबातील होते. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील हडसन नदीमध्ये गुरुवारी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पायलट आणि ३ मुलांसह ६ जणांचा समावेश आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेले ५ जण हे एकाच कुटुंबातील होते. हे कुटुंब स्पेनमधील असून ते सुट्टी एन्जॉय करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आले होते. या अपघातानंतर दोन जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळताच न्यूयॉर्क शहर पोलिस विभाग, तटरक्षक दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. बरेच प्रयत्न करून सर्वांना रेस्क्यू करण्यात आले पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता.
या अपघातामध्ये कोणीही वाचू शकले नाही. हेलिकॉप्टर अपघाताच्या वेळी आकाश ढगाळ होते. वारा ताशी १५ ते २५ किलोमीटर वेगाने वाहत होता. दृश्यमानता देखील चांगली होती. पण त्यावेळी परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला यामागचे कारण समोर आले नाही. सध्या या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत अपघाताची कारणे शोधली जाणार आहेत. हेलिकॉपटरमध्ये तांत्रिक बिघाड, हवामानाची भूमिका किंवा वैमानिकाची चूक यांचा शोध घेतला जाणार आहे. मृतांमध्ये एक पायलट आणि स्पेनवरून सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा समावेश आहे. ज्यात ३ मुलं आहेत. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयाना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.