• Total Visitor ( 368681 )
News photo

भारतीय ज्ञान प्रणाली ही देशाला लाभलेली समृद्ध देणगी ; रविंद्र शिंगणापूरकर

Raju tapal October 08, 2025 127

भारतीय ज्ञान प्रणाली ही देशाला लाभलेली समृद्ध देणगी ; रविंद्र शिंगणापूरकर

तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यशाळा 

         

शिक्रापूर (प्रतिनिधी) :- भारतीय ज्ञान परंपरा ही आपल्याला लाभलेली समृद्ध अशी देणगी आहे. म्हणूनच सर्व जगात आपला भारत देश विश्वगुरू म्हणूनच जगाचे नेतृत्व करणार असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर यांनी केले. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात भारतीय ज्ञान प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिंगणापूरकर बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ.पराग चौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे मराठी विद्यापीठ विभाग प्रमुख डॉ. संदीप सांगळे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ.रविंद्र भगत, हिंदी विभाग प्रमुख डॉ.मनोहर जमदाडे आदी याप्रसंगी उपस्थित होते. शिंगणापूरकर पुढे म्हणाले की, बरेचदा आपण जुने ते सोने असे म्हणतो ते खरेच आहे. आजच्या आधुनिक युगातील युवा पिढीला आपल्या जीवन परंपरेतील आदर्शवत असलेल्या संस्कारक्षम गोष्टी सांगणे गरजेचे आहे. किंबहुना ही काळाची गरज आहे. आपले सण, रूढी, उत्सव, परंपरा या सर्वच गोष्टींचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आज प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण समृद्ध जीवन जगण्यासाठी आपली भारतीय ज्ञान परंपरा आपल्याला आजही प्रेरणा देत असल्याचे रवींद्र शिंगणापूरकर यांनी सांगितले. काळाची गरज म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीचा जाणीवपूर्वक अंतर्भाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेशबापू ढमढेरे म्हणाले की, गुरुकुल पद्धती ही आपल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे. आजच्या आधुनिक व्यवस्थेतही या परंपरेचे महत्व अबाधित आहे. म्हणून भारतीय ज्ञान परंपरा ही आपल्याला लाभलेली समृद्ध परंपरा आहे. या संस्कारक्षम परंपरेचे जतन करण्यासाठी युवकांनी स्वदेशीचा आग्रह धरायला हवा असल्याचे महेशबापू ढमढेरे यांनी सांगितले. त्याग,संस्कार आणि समर्पण या भावनेतून भारतीय ज्ञान पहायला हवे असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अध्यात्म आणि धर्मसंस्कृती देखील समजणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाविद्यालयाच्या प्रगती आणि कार्याचा त्यांनी विस्तृत आढावा घेतला. उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.  डॉ. मनोहर जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रविंद्र भगत यांनी आभार मानले.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement