ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी एकाला अटक
ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी शेतात छापा मारून औसा पोलीसांनी एकाला अटक केली.
नारायण संतराम साठे रा.येळी ता .औसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ लाख २६ हजारांचा १८ किलो गांजा जप्त करण्यात आला.
औसा तालुक्यातील येळी शिवारात ऊसाच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती खब-यामार्फत पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने माहितीची खातरजमा करून शिवारातील शेतात छापा मारला. यावेळी नारायण संतराम साठे रा.येळी ता.औसा याला ताब्यात घेण्यात आले. साठे यांच्या मालकीच्या शेतात बेकायदेशीरपणे गांजाच्या झाडांची लागवड केली होती.छाप्यामध्ये १५ गांजाची झाडे आढळून आली. घटनास्थळाचा पंचांसमक्ष पंचनामा करून १ लाख २६ हजारांचा १८ किलो गांजा जप्त करण्यात आला. औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक घोरफडे, सहाय्यक फौजदार रामराव चव्हाण, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, श्री. सुर्यवंशी,श्री.दंतुरे, महेश मर्डे, समीर शेख, भारत भुरे, डांगे,भागवत गोमारे या पथकाने ही कारवाई केली.