विना अनुदान धोरण कायमचे बंद करण्याची गरज : माजी आमदार पोपटराव गावडे
कायम विनाअनुदान धोरण ही राज्यातील शिक्षण व्यवस्थेसमोरील सध्या मोठी समस्या आहे. हे धोरण कायमचे बंद करून शासनाने ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचालकांना बळ देणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथे संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण तर्फे शिरूर तालुका शिक्षण संस्थाचालकांच्या सहविचार सभेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. गावडे बोलत होते.
शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण चे अध्यक्ष विजय कोलते, उपाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, खजिनदार शिवाजी घोगरे, सहसचिव महेशबापू ढमढेरे, कार्यकारिणी सदस्य विलास पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे या संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंदादा ढमढेरे, प्रकाश पवार, अनिल भुजबळ, राजेंद्र ढमढेरे, रंगनाथ हरगुडे, प्राचार्य डॉ. अशोक नवले , मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा चव्हाण यांच्यासह शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातील विविध संस्थाचालक, त्यांचे प्रतिनिधी व मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.
संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोलते यांनी यावेळी संस्थाचालकांच्या समस्येकडे लक्ष वेधले. पदरमोड करून, खस्ता खाऊन जुन्या लोकांनी संस्था स्थापन केल्या. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार काळाच्या ओघात प्रश्नांचे स्वरूपही बदलले आहे. त्यामुळे संस्थाचालकांच्या विविध समस्यांकडे शासनाने सकारात्मक भूमिकेतून पाहिले पाहिजे असे मत श्री. कोलते यांनी यावेळी व्यक्त केले .
यावेळी संस्थाचालक शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थाचालक सामाजिक बांधिलकी जपून शैक्षणिक कार्य करीत आहेत. विनाअनुदानित हा शब्द शिक्षण क्षेत्रातून लवकर हद्दपार झाला पाहिजे. संस्थाचालकांचे प्रश्न व बारा टक्के वेतनेतर अनुदान शासनाकडून मिळाले पाहिजे, तसेच पवित्र पोर्टल ही योजना रद्द झाली पाहिजे. शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करावी, शिक्षण संस्थांना मालमत्ता करात सूट दिली पाहिजे आदी मागण्यांबाबत देवेंद्र बुट्टे पाटील यांनी यावेळी उपस्थित संस्था चालकांना मार्गदर्शन केले.
संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे सहसचिव व सहविचार सभेचे आयोजक महेशबापू ढमढेरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सहविचार सभेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचालकांनी एकत्र येणे काळाची गरज बनली आहे, संस्थाचालकांच्या अधिकारांवर गंडांतर आले आहे . त्यामुळे आपण सर्वांनी संघटित होऊन आपल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन यावेळी महेशबापू ढमढेरे यांनी केले. केवळ एकी अभावी संस्थाचालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत या मुद्याकडे महेशबापू ढमढेरे यांनी आवर्जून लक्ष वेधले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव व ज्येष्ठ नेते अरविंददादा ढमढेरे, श्रीकांत सातपुते, रंगनाथ हरगुडे यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. श्री. जगदीश राऊतमारे यांनी सूत्रसंचालन तर संस्थाचालक मंडळ पुणे ग्रामीणचे सदस्य विलास पाटील यांनी आभार मानले.