कल्याण डोंबिवलीत महापौरपदी कुणाची होणार निवड....?
राजू टपाल.
कल्याण:- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता साऱ्यांचे लक्ष महापौर पदाच्या खुर्चीकडे लागले आहे. महायुतीने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून शिवसेना आणि भाजपचे मिळून एकूण 103 नगरसेवक निवडून आले आहेत. या यशानंतर दोन्ही पक्षांनी महापौर पदावर आपला दावा ठोकला असून राजकीय वर्तुळात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अद्याप महापौर पदाची आरक्षण सोडत झालेली नाही, त्यामुळे या आरक्षणावरच पुढची सर्व गणिते अवलंबून असणार आहेत. महायुतीतील दोन्ही पक्षांचे संख्याबळ आणि दावे कल्याण डोंबिवलीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी दोन्ही पक्षांमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत,तर भाजपचे 50 उमेदवार विजयी झाले आहेत. दोन्ही पक्षांकडे संख्याबळ जवळपास सारखेच असल्याने कोणाचा महापौर बसणार, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, ठाकरे गटातून निवडून आलेले मधुर म्हात्रे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने नवीन राजकीय समीकरणांची चर्चाही महापालिका वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसेनातील प्रमुख दावेदार जर महापौर पद शिंदे गटाकडे राहिले,तर त्यासाठी अनेक नावे सध्या शर्यतीत आहेत. यामध्ये कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. निलेश शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून ते उच्चशिक्षित आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय आणि पक्ष संघटनेत त्यांनी केलेले काम जमेची बाजू मानली जात आहे. ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचेही नाव चर्चेत आहे. शेट्टी हे पुन्हा एकदा निवडून आले असून त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. याशिवाय अस्मिता मोरे,शालिनी वायले आणि विकास म्हात्रे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. जर आरक्षणाचे समीकरण बदलले तर माजी महापौर रमेश जाधव किंवा हर्षदा थवील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर दुसरीकडे भाजप देखील महापौर पदासाठी आग्रही असून त्यांच्याकडेही दिग्गज चेहऱ्यांची कमतरता नाही. भाजपाकडून दीपेश म्हात्रे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. म्हात्रे यांनी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना (उबाठा) मधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. म्हात्रे हे 2009 पासून नगरसेवक आहेत. तसंच त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद दोन वेळा भूषविले आहे. एक उच्चशिक्षित आणि अनुभवी चेहरा म्हणून म्हात्रे यांचं नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे निकटवर्तीय वरुण पाटील यांचे नाव चर्चेत आहे. तसेच भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमलता पवार यांच्या नावावरही पक्षात खल सुरू आहे. डोंबिवलीतील ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले हे अनुभवाच्या जोरावर या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात. आरक्षणाच्या स्थितीनुसार शशिकांत कांबळे यांचे नाव समोर येऊ शकते. कांबळे हे पहिल्यांदाच निवडून आले असले तरी ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू मानले जातात. तसेच दुसऱ्यांदा विजय मिळवणाऱ्या दया गायकवाड यांच्या नावाचीही सध्या पक्षात चर्चा आहे. सध्या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी असली तरी सर्वांचे डोळे महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहेत. हे पद नेमके कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते,यावरच अंतिम उमेदवाराचा चेहरा निश्चित होईल. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग येणार आहे. तोपर्यंत दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या परीने मोर्चेबांधणी करत असून युतीमधील कोणता पक्ष बाजी मारणार,हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.