जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता मोबाइलद्वारे हजेरी..
मुंबई :- जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाइन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू आहे. मोबाइलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतर हजेरी लावता येणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीवर अधिक बारकाईने लक्ष राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत पुढील काही दिवसांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
यापूर्वी शिक्षकांची हजेरी 'बायोमेट्रिक हजेरी प्रणाली'च्या माध्यमातून घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. मात्र, ही प्रणाली खर्चिक ठरत असल्याने त्याऐवजी जिओफेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइलद्वारे हजेरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या प्रणालीमुळे शिक्षकांना शाळेत वेळेवर उपस्थित राहावे लागणार आहे.
शिक्षकांची ऑनलाइन हजेरी करण्याला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता. परंतु, त्यांच्यासमवेत प्रशासनानी बैठक घेऊन शंकाचे दूर केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शिक्षकांबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांचीही ऑनलाइन हजेरी करण्यात येणार आहे.
अशी होणार मोबाइलवरून हजेरी...
शिक्षकांना देण्यात येणारे मोबाइल ॲप एक आभासी सीमा निश्चित केली जाते. ही सीमा निश्चितीसाठी जीपीएसचा वापर होतो. जेव्हा एखादी व्यक्ती या आभासी हद्दीत प्रवेश करते किंवा त्यातून बाहेर पडते, तेव्हा त्यांची नोंद राहते. शिक्षकांच्या बाबतीत, शाळेचा परिसर एक विशिष्ट भौगोलिक हद्द म्हणून निश्चित केला जाणार आहे. शिक्षक या हद्दीत आल्यानंतरच अॅप मध्ये हजेरी लावू शकतील.