• Total Visitor ( 369532 )
News photo

'उड्डाण घेताच काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद'

Raju tapal July 12, 2025 57

'उड्डाण घेताच काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद',

एअर इंडिया विमान अपघाताचं कारण आलं समोर!



नवी दिल्ली :- भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने (विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था - AAIB) अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला याचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.



एएआयबीच्या प्राथमिक तपासानुसार, एअर इंडियाचे विमान एआय-१७१ ने १२ जून रोजी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच इंजिनला इंधन पुरवठा करणारे स्विचेस रन मोडवरून कटऑफ मोडवर गेले होते. दरम्यान कॉकपिटमध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारले की, “तू इंधन पुरवठा का बंद केलास?” तर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होते की, ‘मी काहीही केलेले नाही’ हा संवादही अहवालातून समोर आला आहे.



एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल आणि सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर होते, दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता. सभरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा ८,६०० तास तर कुंदर यांना १,१०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता. उड्डाणापूर्वी दोन्ही वैमानिकांना पुरेसा विश्रांतीचा कालावधी मिळाला होता, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.



१२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात २६० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विमानात एकूण २४२ लोक होते. त्यापैकी २४१ लोकांचा मृत्यू झाला.



अहवालात पुढे नमूद केले की, काही सेकंद कटऑफची स्थिती राहिल्यानंतर ते बदलून पूर्ववत करण्यात आले. मात्र तोपर्यंत विमानाची उंची कमी झाल्यामुळे सुरक्षित पातळी गाठण्यासाठी वेळ मिळाला नाही. टेकऑफ आणि क्रॅश दरम्यान सुमारे ३० सेकंद विमान चालले, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या बोईंग ७८७-८ विमान आणि GE GEnx-1B इंजिनच्या ऑपरेटरवर कोणत्याही कारवाईची शिफारस करण्यात आलेली नाही.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement