• Total Visitor ( 429360 )
News photo

आषाढी वारी’ला पुण्यातून ७०० ‘लालपरी’

Raju tapal June 06, 2025 58

आषाढी वारी’ला पुण्यातून ७०० ‘लालपरी’,

एकाच गावातील मोठ्या ग्रुपने बुकिंग केल्यास गाडी थेट गावात जाणार



पुणे :- आषाढी वारी’ला विठ्ठल दर्शनासाठी पुण्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने तयारी केली असून, वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, पुण्यातून सातशे बस पंढरपूरसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.



दरवर्षी राज्यातील अनेक वारकरी आणि भाविक पंढरपूरला जाण्यासाठी पुण्यात येतात. शिवाय पुणे जिल्हा आणि शहरातून जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते. गेल्या काही वर्षापासून आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणे विभागातील १४ आगारातून पंढरपूरसाठी एसटी गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ६ जुलै रोजी आषाढी यात्रा असल्यामुळे काही दिवस अगोदर गाड्या सोडण्यात येते. त्यासाठी एसटीच्या पुणे विभागाने एकूण सातशे बस सोडण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये ३५० बस या पुणे विभागाच्या आहेत. तर, इतर ३५० बस या मुंबई प्रदेश आणि विदर्भातून मागविण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पंढरपुरला एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या वारकऱ्यांना एसटी बसची कमतरता भासणार नाही. गेल्या तीन-चार वर्षातील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सर्व १४ आगारासह स्वारगेट, शिवाजीनगर येथून धावणाऱ्या बसची संख्या जास्त असणार आहे.



ग्रुपने बुक करा, एसटी गावात येईल 



वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाने ग्रुप बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. एकाच गावातील ४० जणांच्या समूहाने ग्रुप बुकिंग केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्यात येणार आहे. या लोकांना घेण्यासाठी एसटी गावात जाईल. शिवाय दर्शन झाल्यावर पंढरपूर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.



वारीसाठी असे आहे नियोजन



पुणे विभागातील धावणाऱ्या बस - ३५०

बाहेरील विभागातून मागविलेल्या बस - ३५०

एकूण पंढरपूला सोडण्यात येणारे बस - ७००

गेल्या वर्षी आषाढीला सोडलेल्या बस - ५५८



आषाढीला भाविकांची वाढती संख्या पाहता यंदा बसची संख्या वाढविण्यात आली आहे. पुणे विभागातून ७०० बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे भाविकांची सोय होणार आहे.

अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement